सातारा : दारुच्या नशेत गावातील रहिवाशाचे घर पेटवणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी तरुण हा हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात शिक्षा भोगत होता. संचित रजेवर तुरुंगातून बाहेर आला असताना त्याने हा प्रताप केला होता. सातारा जिल्ह्यात दीड वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील ठाकूरकि येथे खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी अंकुश लालासाहेब चव्हाण जेलमध्ये शिक्षा भोगत होता. तो तुरुंगातून घरी संचित रजेवर आला होता. त्यावेळी दारुच्या नशेत गावातीलच यशवंत बाबू जाधव यांचं घर त्याने किरकोळ कारणावरुन पेटवलं होतं. ही घटना 27 जुलै 2020 रोजी घडली होती.
आरोपीला काय शिक्षा?
या प्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयाने आरोपी अंकुश लालासाहेब चव्हाण याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, कलम 427 प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंड, तसंच दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
पत्नीशी भांडताना शेजाऱ्यांच्या घराची राखरांगोळी
याआधी, पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःचं घर पेटवताना आजूबाजूची दहा घरंही जळून खाक झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातच काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे हा प्रकार घडला होता. नवरा-बायकोचं भांडण एवढ्या टोकाला गेलं होतं, की पतीने स्वतःच्या घराला आग लावली.
आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला होता. ही सर्व घरे जळून खाक झाली होती. याबाबत आरोपी पती संजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली होती. जाळपोळ करणाऱ्या पतीला ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगलाच चोपही दिला होता.
संबंधित बातम्या :
VIDEO | बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं
अंगावर गाडी घातली, फरफटत नेलं, 2 हजारांसाठी वर्धा जिल्ह्यात हत्या
Nagpur Crime चोरी करायला आले, मार खाऊन गेले, वाचा कसा घडला थरार!