सोलापूर : वडापूर खून प्रकरणातील 65 वर्षीय आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमसिद्ध पुजारी असे खून प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे. दोन खुनाच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर आलेल्या आमसिद्ध पुजाऱ्याने तिसरी हत्या केली होती. धारदार शस्त्राने ज्ञानदेव नागणसुरे यांचा निर्घृण खून केल्याप्रकरणी वृद्ध हा मंद्रूप पोलिसांच्या ताब्यात आहे.
55 वर्षीय इसमाचा खून
सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे ही घटना घडली होती. आमसिद्ध पुजारी असे 65 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याने ज्ञानदेव प्रभू नागणसुरे नावाच्या 55 वर्षीय इसमाचा खून केल्याचा आरोप आहे. धारदार शस्त्राने डोकं, मान, गुडघ्यावर वार करुन पुजारीने नागणसूरेंचा जीव घेतला.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
याआधी आमसिद्ध पुजारीने स्वतःच्या पत्नीचा खून केला होता. चारित्र्याच्या संशयावरून सात वर्षांपूर्वी डोक्यात दगड घालून त्याने बायकोची हत्या केल्याचा आरोप होता. तर पंधरा वर्षापूर्वी अंत्रोळी येथील लक्ष्मण सलगरे नामक इसमाचा पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने खून केला होता.
खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर गावात आला होता. त्यानंतर आमसिद्ध पुजारी फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.
कोल्हापुरात एकाची हत्या, सहा जण जेरबंद
दुसरीकडे, धारदार शस्त्राने संतोष श्रीकांत जाधव (वय 42 वर्ष, रा. जवाहरनगर) यांचा निर्घृण खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळीतील सहा जण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरात सापडल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबुराब महामुनी यांनी दिली. शनिवारी रात्री सशस्त्र हल्ला करुन संतोष जाधवांची हत्या करण्यात आली होती.
कोणाकोणाला अटक
शुभम बाळासो काणे (वय 24 वर्ष), निखिल चंद्रकांत माने (वय 21 वर्ष), विपुल आप्पासो नाईक (वय 20 वर्ष), अभिषेक राजू आसाल (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या चौघा जणांना न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधित बातम्या :
पत्नीसह दोघांची हत्या, जन्मठेप भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून
अहमदनगरात घरातच तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, अत्याचार करुन खून केल्याचा पोलिसांना संशय