सोलापूर : युवासेना जिल्हा प्रमुखावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. जीवघेण्या हल्ल्यात मनिष काळजे गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोलापुरात देगाव रोड येथील मरीआई चौक परिसरात हा हल्ला झाला. काळजे यांच्यावर 14 ते 15 जणांच्या जमावाकडून हल्ला करण्यात आला. शेतातून परतत असताना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मनिष काळजेंसह त्यांच्या ड्रायव्हरवरही जमावाने जीवघेणा हल्ला चढवला. विशेष म्हणजे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. हल्ल्यात मनिष काळजे गंभीर जखमी झाले आहेत.
शिवसैनिकांची दुहेरी हत्या, पाच जणांना अटक
दरम्यान, सोलापुरातील मोहोळमध्ये शिवसैनिकांची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी पाच जणांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याचा प्रकार 15 जुलै 2021 रोजी समोर आला होता. शिवसैनिकांच्या बाईकवर टेम्पो घालून अपघात असल्याचं भासवत हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिवसैनिक विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर यांचा अपघाताच्या आडून खून झाला होता.
पुण्यात घडलेला युवासेना पदाधिकाऱ्याच्या खुनाचा थरार
दुसरीकडे, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची गेल्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी मध्यरात्री हल्ला केला होता. दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते.
संबंधित बातम्या :
बाईकवर टेम्पो घातला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापुरात शिवसैनिकाची हत्या
शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं