डोंबिवली : ताडीचे अतिसेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके अशी दोन मयत तरुणांची नावं आहेत. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता, मात्र दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ताडी विक्रेता रवी भटनी याचा शोध सुरु केला आहे.
डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख, स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.
त्यांच्या मित्रांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात विक्रेता रवी भटने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान या दोघांचा मृत्यू ताडीचे अतिसेवन केल्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले. मयत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ताडी पिऊन इतर दोन जणांची तब्येत सुद्धा खालावली होती, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित बातम्या :
नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात, औरंगाबादेत 25 वर्षीय डॉक्टरसह चौघांवर गुन्हा
अंगणात कोंबड्या आल्यावरुन वाद, बारामतीत महिलेची निर्घृण हत्या
केरळमध्ये बायकोंची अदलाबदल करणारं मोठं रॅकेट, परपुरुषांशी लैंगिक संबंधांसाठी हजारोंचा पत्नीवर दबाव