कल्याण : कल्याणच्या कोलशेवाडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला सापळा रचून अटक केली आहे. अलीहसन जाफरी असं या चोरट्याचं नाव आहे. जाफरी आधी महागड्या बाईक्स चोरायचा, त्यानंतर त्यावर बसूनच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या धूम स्टाईल लांबवायचा.
काय आहे प्रकरण?
22 वर्षीय अलीहसन हा सराईत गुन्हेगार आहे. चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीमध्ये त्याचा हातखंडा आहे. चेन स्नॅचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा, त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवर बसून सोनसाखळ्या चोरायचा. त्यानंतर दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा.
सापळा रचून अटक
कल्याणच्या कोलशेवाडी परिसरात चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली आणि या चोरट्यांचा शोध सुरु केला. खबऱ्यांमार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अलीहसनला अटक केली.
साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
त्याच्याकडून पाच मोटरसायकल, तीन साखळ्या असा 4 लाख 53 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आतापर्यंत कल्याण-डोंबिवली भिवंडी , ठाणे मुंबई या ठिकाणी देखील त्याने चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत अशी माहिती कल्याणचे एसीपी उमेश माने-पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून या आधी देखील अनेक सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अलीहसनच्या अटकेनंतर ही वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे.
संबंधित बातम्या :
शॉरमातून गोल्डबार, अंतर्वस्त्रातून सोन्याची पावडर, मुंबई विमानतळावर 18 केनियन महिला सापडल्या
सिमकार्ड बंद पडले म्हणून आला फोन, औरंगाबादच्या महिला वकिलाला 86 हजार रुपयांना गंडवले
अचाट खाणे न् मसणात जाणे…काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त