चंदन पुजाधिकारी / प्रदीप कापसे, मुंबई / 26 जुलै 2023 : नाशिक-पुण्यात सध्या टोळक्याने हैदोस घातला आहे. हातात कोयता घेऊन दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणे या घटनांनी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि जिथे गुन्हेगारांनी दहशत माजवण्याचे प्रकार केले, तेथेच पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत. या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिकरोड आणि विहितगाव येथे चारचाकी, दुचाकी गाड्या जाळल्याची आणि फोडल्याची घटना सलग दोन दिवस घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत समाजकंटकांची परिसरातून धिंड काढली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विहितगाव आणि धोंगडेनगर येथे भर पावसात या संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली.
पुण्यात दोन दिवसापूर्वी सिंहगड रोड परिसरात हॉटेलची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर पुण्यातील हवेली पोलिसांनीही अॅक्शन मोडमध्ये येत गुन्हेगारांची धिंड काढली. जिथं तोडफोड केली तिथंच पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली. तसेच भर रस्त्यातच गुन्हेगारांना चोपही दिला. वैभव इक्कर आणि चेतन चोरघे अशी दोघा गुन्हेगाराची नावे आहेत. या कामगिरीबद्दल हवेली पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.