कल्याण : दिवसाढवळ्या घरात घुसून मोबाईल करणाऱ्या चोरट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. शाहरूख खान असे या चोराचे नाव असून हा सराईत चोरटा आहे. रविवारी दुपारी एका घरातून मोबाईल चोरुन पळताना तरुणीच्या प्रसंगावधानामुळे चोरट्या जेरबंद करण्यास यश आले. सध्या महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्यावर गुन्हा दाखल करत त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेत रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका भुरट्या चोराने घरात घुसून घरातील हॉलच्या टेबलावर ठेवलेला मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.
घरातील तरुणीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरटा मोबाईल घेऊन पळून गेला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर स्थायिक नागरिकांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ठाणे जिल्ह्याच्या कळवा परिसरात राहणारा 20 वर्षीय शाहरूख फिरोज खान हा सराईत चोरटा असून, त्याच्यावर ठाणे आणि इतर राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
विशेष म्हणजे हा चोरटा दिवसाढवळ्या इमारतीत किंवा चाळींमध्ये घराचे दरवाजे उघडे असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करायचा. घरातील मौल्यवान वस्तू लंपास करायचा. मात्र या शाहरुखचा डाव कल्याणमध्ये फसला.
कल्याणमधील रामवाडी परिसरात राहणारे 63 वर्षीय सेवानिवृत्त प्रेमनाथ मोदगीकर हे राहतात. प्रेमनाथ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी दुपारी प्रेमनाथ यांच्या पाचव्या मजल्यावरील घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी घरातील काही मंडळी बाहेर गेली होती.
घरात प्रेमनाथ यांची मुलगी सीमरन एकटीच होती. ती किचनमध्ये होती. तिचा मोबाईल हॉलमध्ये होता. कुणीही नसल्याचे पाहून शाहरूख खाने याने गुपचूप घरात प्रवेश केला. प्रेमनाथ यांच्या घरातील सभागृहात ठेवलेला 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन तो पळू लागला.
सिमरनला याची चाहूल लागताच तिने शाहरुखचा पाठलाग केला. तिने या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने सिमरनला जोरात धक्का देऊन खाली पाडले. या संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला.
मात्र सिमरनने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी शाहरुखला पकडले. चोराला कल्याण महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले.
महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या एपीआय देवदास ढोले, विजय भालेराव, पोलीस नाईक शेळके, शिरसाठ, जितू पाटील यांनी या चोराला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली.
पोलीस चौकशीत त्याने याआधी पाच गुन्हे केल्याची कबुली देत, त्या घरातून चोरलेला मुद्देमाल ही पोलिसांना दिला. सध्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.