दहा वर्षे ईमानदारीने काम केले, पण प्रेमात पडली अन् नको ते करुन बसली !

| Updated on: Apr 27, 2023 | 6:01 PM

मालकिणीने कार्यक्रमाहून आल्यानंतर दागिने कपाटात काढून ठेवले. त्यानंतर महिनाभराने पुन्हा कार्यक्रमाला जाताना दागिने घालण्यासाठी कपाट उघडले तर हैराणच झाली.

दहा वर्षे ईमानदारीने काम केले, पण प्रेमात पडली अन् नको ते करुन बसली !
मोलकरणीने मालकिणीचे दागिने चोरले
Image Credit source: TV9
Follow us on

गोविंद ठाकूर, मुंबई : मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यावसायिकाच्या घरातून 1 कोटी 71 लाखाचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील मोलकरणीनेच ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियकराच्या सांगण्यावरुन मोलकरणीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी एक पथक तयार करून मोलकरीणसह पाच आरोपींना मुंबई आणि आसपासच्या परिसरातून अटक केली. मायलेन जेम्स सुरेन उर्फ ​​मोना, अब्दुल मुनाफ तौफिक शेख, हसमुख कामरान बगडा, नुरुद्दीन शेख आणि संगीता कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रियकराच्या सांगण्यावरुन मोलकरणीने केली चोरी

मायलेन जेम्स सुरेन उर्फ ​​मोना ही महिला गावदेवी परिसरातील व्यावसायिक शरदकुमार संघवी यांच्या घरी गेल्या 10 वर्षापासून काम करत होती. मोनाचे अब्दुल मुनाफसोबत प्रेमसंबंध सुरु होते. अब्दुलनेच मोनाला संघवी यांच्या घरातून नियोजनपद्ध पद्धतीने फेब्रुवारीपासून थोडे थोडे दागिने चोरायला सांगितले होते. त्यानुसार मोना मालकिणीचे दागिने चोरत होती आणि आरोपीकडे देत होती. यानंतर अब्दुल मुनाफ हा हिरे बाजार आणि सोने बाजारातील वेगवेगळ्या दलालांमार्फत या दागिन्यांची विल्हेवाट लावायचा.

14 एप्रिल रोजी मालकिण दागिने घालण्यासाठी गेली असता घटना उघड

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2023 रोजी संघवी यांची एका कार्यक्रमातून आल्यानंतर तिने दागिने कपाटात काढून ठेवले. तिजोरीची चावीही कपाटातच होती. यानंतर 14 एप्रिल रोजी दागिने घालण्यासाठी मालकिणीने कपाट उघडले असता दागिने गायब होते. तिने घरातील सर्व नोकरांना याबाबत विचारले असता, सर्वांनी आपल्याला माहित नसल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

पाच आरोपींना अटक

यानंतर मालकिणीने गावदेवी पोलीस ठाणे गाठत दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरातील सर्व नोकरांना पोलीस ठाण्यात आणत कसून चौकशी केली असता मोना हिने चोरीची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी महिलेने दिलेल्या माहितीनुसार अन्य आरोपींनाही अटक केली. आरोपींकडून सोन्याचे दागिने, पाच सोन्याच्या बांगड्या, 11 लाखांची रोकड आणि चोरीच्या पैशांनी खरेदी केलेले दोन मोबाईल फोन आणि स्कूटर असा ऐवज जप्त केला आहे.