ग्रेटर नोएडा : यमुना एक्सप्रेस वे (Yamuna Express Way) वर झालेल्या भीषण अपघातात चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रेटर नोएडाच्या जेवार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या यमुना एक्सप्रेस वेवर आग्र्याहून नोएडाला जात असताना जेवर टोल प्लाझाच्या 40 किमी आधी माईलस्टोनजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या बोलेरो कारचे नियंत्रण सुटले (Bolerao Car Accident) आणि पुढे जाणाऱ्या डंपरला ती धडकली. यामध्ये पुणे-कर्नाटकाहून प्रवास करणाऱ्या कुटुंबातील पाच जणांचे निधन झाले.
पहाटे पाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात कारमधील सात जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच जेवर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी चार महिला आणि एका पुरुषाला मृत घोषित करण्यात आले. तर अन्य दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. दोघेही जखमी जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी अपघात स्थळावरून वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे.
यमुना एक्सप्रेस मार्गावरील या अपघाताची दृश्यं भीषण आणि वेदनादायक आहेत. एडीसीपी झोन 3 विशाल पांडे यांनी सांगितले की, पुणे आणि कर्नाटकातील दोन कुटुंब बोलेरोमध्ये बसून आग्राहून नोएडाला येत होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जेवर टोल प्लाझाजवळ भरधाव वेगात असलेली बोलेरो कार अनियंत्रित होऊन पुढे जात असलेल्या डंपरमध्ये घुसली.
अपघातग्रस्त बोलेरोमधून चंद्रकांत नारायण बुराडे, सुवर्णा चंद्रकांत बुराडे, मालन विश्वनाथ कुंभार, रंजना भरत पवार, नुवंजन मुजावर, नारायण रामचंद्र कोळेकर, सुनीता राजू गस्टे प्रवास करत होते.
माहिती मिळताच जेवर कोतवाली पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चंद्रकांत नारायण बुराडे, सुवर्णा चंद्रकांत बुराडे, मालन विश्वनाथ कुंभार, रंजना भरत पवार, नुवंजन मुजावर यांना मृत घोषित करण्यात आले. तर नारायण रामचंद्र कोळेकर आणि सुनीता राजू गस्टे हे दोघे गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी अपघातस्थळावरून वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. डंपर ताब्यात घेऊन अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.