32 मिनिटांत लुटले 20 कोटींचे दागिने… धनत्रयोदशीपूर्वी रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये चोरट्यांचा धूमाकूळ, VIDEO व्हायरल

| Updated on: Nov 10, 2023 | 11:55 AM

डेहराडून येथील रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये मोठा दरोडा पडला आहे. 32 मिनिटांत चोरट्यांनी 20 कोटींचे दागिने लुटून घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे जिथे ही लूट झाली त्या ठिकाणापासून पोलीस मुख्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे, पण कोणालाही या घटनेबद्दल काहीच सुगावा लागाल नाही.

32 मिनिटांत लुटले 20 कोटींचे दागिने... धनत्रयोदशीपूर्वी रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये चोरट्यांचा धूमाकूळ, VIDEO व्हायरल
Follow us on

डेहराडून | 10 नोव्हेंबर 2023 : आज दिवाळी.. धनत्रयोदशीचा शुभ दिवस. पण या दिवसाच्या फक्त एक दिवस आधी डेहराडूनमधील रिलायन्स ज्वेलर्स शोरूमच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. शोरूममध्ये घुसलेल्या काही लुटारूंनी अवघ्या 32 मिनिटांत हात साफ केला आणि 20 कोटींचे दागिने घेऊन ते फरार झाले. शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी चोरट्यांनी काहींना बंदुकीचा धाक दाखवला तर काहींना बेदम मारहाणही केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा धक्का एवढा मोठा होता की दरोडेखोर निघून गेल्यानंतरही काही महिला कर्मचाऱ्यांना भीतीने आपले अश्रू आवरता आले नाहीत.

कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चार लुटारू त्या शोरूममध्ये घुसले तर त्यांचे काही साथीदार बाहेर पहार देत उभे होते. राजपूर रोडवर असलेल्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये दरोड्याची ही घटना गुरूवारी, भरदिवसा घडली.

अवघ्या 32 मिनिटांत दरोडा

राजपूर रोडवर असलेले हे शोरूम सकाळी 10.15 वाजता उघडले होते. ग्राहक येण्यापूर्वीच शोरूमधील 11 कर्मचारी दागिने नीट मांडून ठेवत होते. तर दुकानाच्या डिस्प्ले बोर्वर हिरे आणि सोन्याचे वीस कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने होते. मात्र अचानक 10.24 च्या सुमारास मास्क घातलेले चार चोरटे शोरूममध्ये घुसले. सर्वात आधी त्यांनी दुकानाचा सुरक्षारक्षक हयात सिंगला आत ओढले. यानंतर शोरूममधील संपूर्ण कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवण्यात आले. त्यांचे मोबाईल जप्त केले. काही कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

त्यायानंतर हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांचे हात प्लास्टिकच्या बँडने बांधले आणि शोरूमच्या पॅन्ट्री रूममध्ये (स्वयंपाकघर) सर्वांना कोंडून ठेवले. मात्र काही महिला कर्मचाऱ्यांना बाहेर आणले आणि डिस्प्ले बोर्डवर लावलेले दागिने काढून बॅगमध्ये भरण्यास भाग पाडले. अवघ्या 32 मिनिटांत, म्हणजे 10 वाजून 56 मिनिटांनी दरोडेखोरांनी दागिन्यांसह सर्व माल असलेली बॅग घेतली आणि घटनास्थळावरून ते फरार झाले.

 

भरबाजारात, भरदिवसा पडला दरोडा तरी कोणालाच कळलं नाही…

रिलायन्सचं हे शोरूम राजपूर रोडवरील ग्लोब चौकाजवळ आहे. हे शोरूम ज्या कॉम्प्लेक्समध्ये आहे ती चार मजली इमारत असून तळघरात पार्किंग आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते मात्र चोरटे अर्धा तास शोरूममध्ये होते तरी कोणालाही त्याची कल्पना आली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावरच आजूबाजूच्या लोकांना दरोडा पडल्याचे समजले. हे दरोडेखोर पळून जात असताना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले. दागिने लुटून ते बाईकवरून फरार झाले

जवळच होती पोलिस चौकी तरी..

राजधानीत चोरीच्या इतक्या मोठ्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कठोर भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक अशोक कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एपी अंशुमन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले. ज्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये हा दरोडा पडला, तेथून सचिवालय आणि पोलीस मुख्यालयाच्या अगदी हाकेच्या अतंरावर आहे. मात्र तरीही पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांनी लूटमार केली आणि ते पळून गेल्याने खळबळ माजली आहे.