मालेगाव ( नाशिक ) : नाशिकच्या मालेगावात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे दिवसाधवळ्या लूटमारीच्या घटना घडत आहे. मालेगाव येथील सटाणानाका भागातील सराफ व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत संशयितांकडून एक लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिक थोरात यांनी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. थोरात हे आपल्या मंगलमूर्ती ज्वेलर्स या दालनात बसले असतांना कारमधून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागितली.
दरम्यान, थोरात यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे संशयितांनी कंबरेला बंदूक असल्याचे भासवत त्यांना धमदाटी केली. यामुळे थोरात यांनी पैसे आणून देतो, असे सांगितल्याने संशयितांनी थोरात यांना वारंवार फोन करुन पैशांची मागणी सुरु आहे.
सराफ व्यावसायिकाकडे खंडणीसाठी तगादा सुरु झाल्याने शहरातील सराफ व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी थोरात यांच्या फिर्यादीवरुन छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भोजणे तपास करीत आहेत.
मालेगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. हल्ल्याच्या घटनाही वाढत असून त्यामुळे पोलिसांचा धाक शिल्लक राहिला की नाही असा सवाल काही नागरिक उपस्थित करीत आहे. त्यामध्ये रात्रीची गस्त वाढवण्याची मागणीही नागरिक करीत आहे.
ज्वेलर्सला धमकावून खंडणी मागीतल्याने संशयित गुन्हेगारांची मजल कुठपर्यंत गेली आहे याचा अंदाज येईल. चारचाकी मध्ये बसून येतात बिनधास्त दमदाटी करतात यामुळे ज्वेलर्सच्या दुकांदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली असून कारवाईची मागणी केली जात आहे.