मालेगाव ( नाशिक ) : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात वसूलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर ग्राहकाने हल्ला चढविला होता. या घटनेनंतर संपूर्ण महावितरण वर्तुळात संतापाची लाट असतांना दुसरीकडे आता महावितरण कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. मालेगावमध्ये ही घटना घडली असून कर्मचाऱ्यांणी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगाव येथील डोंगराळे गावात ही घटना घडली आहे. त्यामुळे आता वसूली करायची की नाही याबाबत महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांस काहींनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेने महावितरण कर्मचाऱ्यांच्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून कामबंद आंदोलन सुरू करत मालेगावात महावितरण कंपनीच्या कर्मचारी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
ज्या ग्राहकांनी मारहाण केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाचे निवेदन महावितरणच्या अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मालेगाव येथील मोती भवन येथे सर्व वसूली अधिकारी यायला सुरुवात झाली असून ग्राहकांकडे वसूलीसाठी गेल्यानंतर मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. नाशिक शहरातील माराहणीची घटना ताजी असतांना आता मालेगावमध्ये झालेली घटना बघता कर्मचारी आक्रमक झाले आहे.
अनेक ग्राहक वीजबिल सांगून भरत नाहीये. वसूलीसाठी गेल्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण होत असल्यास वसूली करायची की नाही याबाबत विचार करावा लागेल असेही कर्मचारी मत व्यक्त करत असून मालेगावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.