सोमवारी देशभरात धुळवडीचा, रंगांचा सण उत्साहात साजरा झाला. मुंबईतही लोकांनी रंगांच्या सणाचा आनंद लुटला. मात्र याच रंगाचा बेरंग करणारी एक घटना मालाडमध्ये घडली. तिथे एका अल्पवयीन मुलीला रंग लावण्यासाठी एका व्यक्तीने घराबाहेर खेचून तिचा विनयभंग केला. एवढंच नव्हे तर त्या मुलीने या प्रकाराला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने त्या मुलीला आणि तिच्या आईला मारहाण तसेच शिवीगाळही केली, असा आरोप आहे.
याप्रकरणी विनयभंग करणाऱ्या 35 वर्षीय आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या प्रकारामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित मुलगी अल्पवयीन असून ती मालाड येथे राहते. रात्रीच्या सुमारा ३५ वर्षीय आरोपीने पीडित मुलीला रंग लावण्यासाठी तिचा हात पकडून तिला घराबाहेर खेचू लागला, त्याने तिचा विनयभंगही केला. यामुळे भेदरलेल्या मुलीने कशीबशी हिंमत गोळा करत आरोपीला विरोधा केला. बाहेर येण्यास नकार दिला असात आरोपी संतापला आणि त्याने पीडित मुलीला मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. एवढंच नव्हे तर त्याने पीडितेच्या आईलाही मारहाण केली. पीडित मुलीचे वडील व काकांनीही आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी विनयभंग, मारहाण व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.