लग्न करण्यास नकार दिला म्हणून एका शिक्षिकेवर लोखंडी सळीने जीवेघणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना मालाडमध्ये घडली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीला पोलिसांनी अद्यापही ताब्यात घेतलेले नाही. या घटनेत पीडित तरूणी गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला, डाव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा हल्ला करणारा आरोपी चमन ऊर्फ मोहम्मद हारून इद्रीस (२५) याचा पोलिस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली. पीडित तरूणी ही शिक्षिका असून ती मालाड पूर्व येथील रहिवासी आहे. ती खासगी कॉम्प्युटर क्लासेसमध्ये शिकवते. आरोपी चमन हा पूर्वीपासूनच पीडितेला त्रास देत होता. त्याचं तिच्यावर एतर्फी प्रेम होतं. शनिवारी पीडित तरूणी क्लासला जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा आरोपी चमन ऊर्फ मोहम्मद हारून इद्रीसने तिला रस्त्यात गाठले आणि माझ्याशी लग्न करशील का विचारत प्रपोज केले. मात्र पीडितेने त्याचा मागणीला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी सळीने तिच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्या तरूणीच्या डोक्याला तसेच डावा हात आणि कंबरेला दुखापत झाली. तिच्यावर सध्या शताब्दी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत
या हल्ल्याची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आरोपी लोखंडी सळी बरोबरच घेऊ आला होता त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे समजते. याप्रकरणी पीडित तरूणीच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, विनयभंग अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातही धक्कादायक प्रकार, प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून कोयत्याने हल्ला
असाच काहीस प्रकार पुण्यात देखील घडला आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून भरदिवसा अकरावीत शिकणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 मध्ये ही घटना घडली. यावेळी महिलांनी आरडा-ओरडा केल्यामुळे दुचाकीवरुन आलेले आरोपी पळून गेले. महेश सिद्धप्पा भंडारी (वय.22,रा. जनता वसाहत) याचे एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रेम होते. ती मुलगी बोलत नाही, तिने प्रेमसंबंध संपवले, या रागातून महेश आणि आणखी एकाने तिला भररस्त्यात अडवले. तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील महिलांनी आरडाओरजा केल्याने ते पळून गेले आणि ती मुलगी थोडक्यात वाचली.