मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : बाबा आणि लेकीचं प्रेम,नातं जगावेगळं असतं. जगापुढे खंबीरपणे उभा राहणारा बाप लेकीसाठी अगदी हळवा होता. तिला जरा खरचटलं तरी तो कासावीस होतो. अशी अनेक प्रेमळ उदाहरणं आपण पाहिली, ऐकली असतील. पण या प्रेमावरचा विश्वास उडून जाईल अशी एक कूर आणि धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. जेथे एका पित्याने त्याच्या पोटच्या पोरीबद्दल टोकाचं (man killed daughter) पाऊल उचललं. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर पतीने त्याचा राग आपल्या लेकीवर काढला आणि तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये अवघ्या 18 महिन्यांच्या (दीड वर्ष) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अल्ताफ मोहम्मद समिउल्ला अन्सारी (26) याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास डायघर गाव येथील अभय नगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी अल्ताफ याचे त्याच्या पत्नीशी काही कारणावरून भांडण झाले. त्याने रागाच्या भरातच पत्नी आणि लहानग्या लेकीला घराबाहेर काढले. त्याने अवघ्या दीड वर्षांच्या लेकीला जमीनीवर एवढ्या जोरात फेकले की तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. अल्ताफ याचे पत्नीशी १५ दिवसांपूर्वीही भांडण झाले होते. त्याचाच राग त्याच्या मनात होता असे समजते.
अल्ताफ याला दारूचे व्यसन होते. त्या मुद्यावरून त्याचे पत्नीशी अनेकवेळा भांडण व्हायचे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्राही दाख केली होती, अशी माहिती समोर आली आहे.