मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून आई-वडील कामाला गेल्याचे पाहून आजोबांनी त्यांच्याच अल्पवयीन नातीवर महिनाभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजीच आहे. यामुळे मुंबईत एकच खळबळ माजली होती. हा दुर्दैवी प्रकार नुकताच उघडकीस आलेला असतानाच आता मुंबईतील अंधेरी भागात अशीच एक आणखी दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रासोबत तुझा व्हिडीओ पालकांना दाखवेन, तो व्हायरल करेन अशी धमकी देत एका 53 वर्षांच्या नराधमाने अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला त्याच्या वासनेची शिकार बनवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झालं आहे.
याप्रकरणी डी.एन. नगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारे अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपीसह वॉच ठेवणाऱ्या आरोपीलाही अटक केली आहे.
या दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी अवघी 14 वर्षांची असून ती मुंबईत आई-वडिलांसह राहते. आरोपी हा 53 वर्षांचा असून तो तिचा परिचितच आहे. त्याने त्या मुलीला एका तरूणासोबत मैत्री करण्यास प्रवृत्त केलं. मात्र त्यानंतर त्याच्यासोबत त्या मुलीचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ तुझ्या आई-वडिलांना दाखवेन, सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. आणि त्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने ही माहिती मालकांना देताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी अखेर डी. एन. नगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. अत्याचार करणारा आरोपी आणि मुलीवर वॉच ठेवणारा दुसरा आरोपी अशा दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
अमरावतीमध्ये शाळेत शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग
अमरावतीच्या शिंदी बुजरुक गावातही एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील शाळेत शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला असून गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघड झाली आहे.
पथ्रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदी येथील खासगी संस्थेच्या शाळेतील प्रकार आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना उघड झाल्यानंतर गावकरी आक्रमक झाले असून संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाची कार तोडफोड करत कार उलटवली . तसेच हजारो गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली, तेव्हा स्वत:ला वाचवण्यासाठी शिक्षकाने शाळेत कोंडून घेतले होते . शाळेच्या आवारात गावकरी गेल्यानंतर शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या ही मागणी केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता.