मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : व्हिला आणि बंगल्यांचे ऑनलाइन बुकिंग (online booking) करण्याच्या बहाण्याने सुट्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक (fraud) करणाऱ्या एका ठकसेनाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे . आकाश वाधवानी (वय 23) असे आरोपीचे नाव असून तो घाटकोपरचा रहिवासी आहे. त्याला सोमवारी जुहू येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली. अटक टाळण्यासाठी आरोपी हा अनेक आलिशान हॉटेलामध्ये रहायचा. त्याच्याविरोधात अशा जवळपास 20 केसेस आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एका खासगी फर्मच्या कर्मचाऱ्याने वाधवानी याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. त्या फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने सुट्टीसाठी अलिबागमधील व्हिला ऑनलाइन बुक करण्याचा प्रयत्न केला असता तिची ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. फिर्यादीच्या सांगण्यानुसार, ती सुट्टीसाठी अलिबागमध्ये व्हिला आणि बंगले शोधत असताना तिला ‘vistarastays.com’ ही वेबसाइट दिसली. वेबसाइटशी संपर्क साधल्यानंतर अलिबाग येथील एक व्हिला बूक करण्यासाठी तिला 90,000 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तिने ते पेमेंटही केले.
सुट्टीची तारीख जवळ आल्यावर फिर्यादीने बुकिंग करण्यासाठी ज्याच्याशी संवाद साधला, त्याच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या इसमाशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. आणि फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आम्ही आरोपी वाधवानी याला जुहू येथील हॉटेलमधून पकडले, असे पोलिसांनी सांगितले. वाधवानी याने बनावट वेबसाइट तयार करून अनेकांची फसवणूक केली. अशा सुमारे 20 केसेसमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. आरोपी वाधवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिस म्हणाले.