दोन दिवसांपासून घरातून येत होता दुर्गंध, दार उघडलं आणि..

| Updated on: May 06, 2024 | 9:55 AM

वीज बिल जास्त आलं म्हणून भडकलेल्या ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून हत्या केल्याची घटना ताजी आहेच. मात्र आता अशीच मुंबईतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. वीज बिलाच्या वादातून एका इसमाने त्याच्याच घरमालकाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार गोवंडीमध्ये घडला

दोन दिवसांपासून घरातून येत होता दुर्गंध, दार उघडलं आणि..
Follow us on

वीज बिल जास्त आलं म्हणून भडकलेल्या ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून हत्या केल्याची घटना ताजी आहेच. मात्र आता अशीच मुंबईतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. वीज बिलाच्या वादातून एका इसमाने त्याच्याच घरमालकाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार गोवंडीमध्ये घडला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी 63 वर्षांच्या आरोपीला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं ?

गोवंडी येथे खुनाचा हा खळबळजनत प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल शेख ( वय 63) असे आरोपीचे नाव असून गणपती झा (वय 49) असे मृत इसमाचे नाव आहे. ते बैंगनवाडी येथे रहायचे. गुरूवारपासून बैंगनवाडी येथील त्यांच्या राहत्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता समोरचं दृष्य पाहून ते हबकलेच. दोन दिवसांपूर्वीच झा यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्यांची तसेच कुटुंबियांचीही चौकशी सुरू केली. तेव्हा मृत व्यक्तीचा भाऊ दिनेश याच्याकडून त्यांना महत्वाची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वीच गणपती यांचे भाडेकरू अब्दुल शेख याच्याशी भांडण झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी अब्दुल याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला.

हातोड्याने केले तोंडावर वार

30 एप्रिल रोजी गणपती आणि भाडेकरू अब्दुल यांच्यात वाद झाला होता. वाढत्या वीजबिलावरून त्यांचं भांडण झालं होतं. भांडणादरम्यान गणपतीने अब्दुल याला शिवीगाळ केली होती. संतापलेल्या अब्दुल शेक याने गणपतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेव्हा गणपतीने स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रतिकार केला. मात्र तेव्हाच आरोपी अब्दुल यानी त्याच्याकडील हातोड्याने घरमालक गणपती याच्या तोंडावर केला, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तसाच सोडून अब्दुल शेख निघून गेला. जखमी अवस्थेतील गणपती यांचा राहत्या घरात मृत्यू झाला. दोन दिवसांनी दुर्गंध येऊन लागल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि खुनाचा हा गुन्हा उघडकीस आला.