भोपाळ : माणूस माणुसकी विसरून चालला असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर भूतदया दाखवणाऱ्या लोकांचीही संख्या कमी होत चालली आहे. उलट लोक आता प्राण्यांना दूर लोटण्यासाठी त्यांच्यावर निर्दयी हल्ले करू लागले आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भूतदयेला धक्का देणारा निंदनीय प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराने माणुसकी धर्मालाही मान खाली घालायला लावली आहे. एका नागरिकाने राक्षसी वृत्ती दाखवत एक कुत्रा आणि त्याच्या तीन पिल्लांना अत्यंत निर्दयीपणे मृत्यूच्या जबड्यात लोटले. कुत्रीला विष दिले आणि तिच्या पिल्लांना जिवंत जाळले. त्यात गंभीर जखमी झालेल्या पिल्लांना काही वेळातच प्राणाला मुकावे लागले.
या धक्कादायक घटनेने केवळ प्राणीप्रेमींनाच नव्हे तर सर्वच नागरिकांना हादरून सोडले आहे. भोपाळमध्ये या घटनेवरून तीव्र पडसाद उमटले असून, प्राणीमित्रांकडून घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
भोपाळ शहरातील चिनार पार्क या लोकवस्तीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. क्रूरकर्म्याने ज्या कुत्रीला विष घालून मारले, त्या कुत्रीने काही दिवसांपूर्वीच तीन पिल्लांना जन्म दिला होता. परिसरात आता कुत्र्यांची संख्या आणखी वाढणार हे न पटल्यामुळे आरोपीने कसलाही विचार न करता कुत्र्यांना जिवंत मारण्याचा निश्चय केला.
याच कुटील हेतूने त्याने सुरुवातीला कुत्रीला विष घालून मारले आणि त्यानंतर तिच्या पिल्लांना जिवंत जाळले. पिल्ले आगीत होरपळत असताना जीवाच्या आकांताने ओरडत होती. मात्र त्यानंतरही आरोपीच्या हृदयाला पाझर फुटला नाही. त्यांनी त्या पिल्लांना तडफडतच जीव जाईपर्यंत वाट पाहिली. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार भोपाळमधील जनतेसाठी सध्या संतापाचा विषय ठरला आहे.
पशुप्रेमींना या धक्कादायक घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नजीकच्या एमपी नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच तक्रारीच्या आधारे फरार आरोपी विरुद्ध भादवी कलम 429 तसेच पशु क्रूरता कायद्याच्या कलम 13 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे. आरोपीला लवकरच अटक करू, असा विश्वास एमपी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर अरजरिया यांनी व्यक्त केला आहे.