अवघ्या 1200 रुपयांमुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडल्याचे उघडकीस आले. कळंबोली पोलिस ठाणे हद्दीत दोन दिवसांपूर्वी हा अतिशय खळबळजनक प्रकार घडला असून धक्कादायक गोष्ट म्हणजे याप्रकरणात मध्यस्थी करायला गेलेला एक इसमही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.याप्रकरणी नवी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत. परवेज अन्सारी असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून सद्दाम हुसैने असे आरोपीचे नाव आहे. कळंबोली पोलिसांनी आरोपीला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली
नेमकं काय घडलं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परवेज अन्सारी आणि सद्दाम हुसेन हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. परवेज अन्सारी हे सुपरवायझर होते, अन्सारी यांच्याकडून सद्दाम हूसैन अन्सारी याला 1200 रुपये येणं बाकी होतं. शुक्रवारी रात्री घरी असताना ११.३०च्या सुमारास सद्दाम हुसेनने पैशांच्या हिशेबासाठी परवेझ अन्सारीला यांना कळंबोली सेक्टर-14 मधील झुडिओ मॉलजवळ बोलावून घेतले.
तेव्हा परवेज अन्सारी हे आपल्या सहकाऱ्यच्या स्कूटीवरून तेथे पोहोचले. यावेळी सद्दाम हुसेनने परवेझ यांच्याकडे कडे कामाचे 1200 रुपये देण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर सोडणार नाही, असी धमकीही त्याने परवेझ यांना दिली. येत्या 20 तारखेपर्यंत पैसे देतो, असे परवेझ यांनी सांगितले. पण सद्दाम याला त्या गोष्टीचा राग आला आणि त्याने त्याचजवळ असलेल्या
चाकूने परवेझच्या छातीवर व हातावर सपासप वार केले. त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, तोही जखमी झाला.
या हल्ल्यात जखमी परवेझ यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी सहकाऱ्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर कळंबोली पोलिसांनी सद्दाम हुसेनविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. तो फरार झाला होता. शनिवारी दुपारी तो कल्याण रेल्वे स्थानकातून गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र तेवढ्यात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत