ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंग दम मगर तेरा साथ ना छोडेंग… घट्ट, जीवाभावाच्या मित्रांसाठी हे गाणं नेहमीच गायलं जातं. एखादा उत्तम, जीवश्चकंठश्च मित्र मिळणं हे चांगल्या नशिबाचा भाग असतो असं म्हणतात. असा मित्र
मिळणं आजकाल दुर्मिळच आहे, पण काही वेळा असा मित्र मिळतो, त्याचे कारनामे पाहून अशा मित्रापेक्षा शत्रूच बरा असं म्हणावसं वाटतं. दोस्तालाच धोका देत त्याला दुसऱ्या मित्रान लुटलण्याची एक दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली आहे. पैशांच्या मोहापायी एका इसमाने त्याच्या मित्राचा विश्वासघात केला आणि त्याचे पैसे लुटले. लाखभर रुपये लुटत त्याने त्याच्याच मित्राला गंडा घातला. याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या मुख्य आरोपीसह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांचा आणखी एक साथीदार मात्र अजूनही फरार असून मानपाडा पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पैसे पाहून नियत फिरली आणि…
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये हा विश्वासघाताचा आणि फसवणुकीचा प्रकार घडला. शुभम असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुभम आणि आरोपी वीरेंद्र गुप्ता हे दोघे मित्र होते. शुभमकडे बरेच पैसे असल्याची माहिती वीरेंद्रला मिळाली होती. आणि त्याच पैशांच्या लोभाने त्याची नियत फिरली. त्याने आपल्याचा मित्राला लुटून त्याचे पैसे लुबाडण्याचा प्लान आखला. वीरेंद्रने त्याच्या दोन मित्रांना प्लानमध्ये सहभागी करून घेतलं आणि त्यांनाच तोतया पोलिस अधिकारी बनवून त्या मित्राच्या ऑफीसमध्ये पाठवलं.
त्यांनी आखलेल्या प्लाननुसार ते दोघे तोतया पोलीस बनून शुभमच्या ऑफीसमध्ये गेले आणि त्याला जबरदस्तीने ऑफीसच्या बाहेर काढत गाडीत नेऊन बसवलं. तसेच त्याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. अखेर ते तोतया पोलीस त्याच्याकडून 1 लाख रुपये घेऊन पसार झाले.
या प्रकारानंतर शुभमने मानपाडा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. ऑफीसमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे या गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू करत या प्रकरणी तीन आरोपीना बेड्या ठोकल्या. या टोळीचा मास्टरमाईंड वीरेंद्र गुप्ता तसेच त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली. वकील अहमद खान ,शिवानंद पांडे अशी उर्वरित दोघांचे नावे आहेत. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेला त्यांचा एक साथीदार अजूनही फरार असून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.