अयोध्या | 12 ऑगस्ट 2023 : लग्न (marriage) हे एक पवित्र, सातजन्मांचं बंधन असतं. पण काही लोकं तसं मानत नाहीत. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे घडलं आहे. तिथे एका व्यक्तीने त्याची पहिली पत्नी जिवंत असतानाही (man married to another woman) पुन्हा लग्न केलं, एवढंच नव्हे तर दुसऱ्या बायकोलाही त्याच घरात आणून ठेवलं. याप्रकरणी पहिल्या पत्नीने पती आणि सवतीविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या लग्नानंतर आरोपी पतीने आपल्याला खर्चासाठी पैसे देणेही बंद केले आहे. त्यामुळे मुलासह स्वत:ला दोन वेळचं जेवण मिळणंही अतिशय कठीण झालं आहे. आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी पहिल्या पत्नीने पोलिस आणि प्रशासनाकडे केली आहे. हे प्रकरण अयोध्येजवळील कोला शरीफ गावचे आहे. कुसुम असे पहिल्या पत्नीचे नाव असून 20 वर्षांपूर्वी तिचं लग्न राजेश नावाच्या व्यक्तीशी झाले होते. त्यांना एक मुलगाही आहे. आत्तापर्यंत त्यांच्या घरात सर्वकाही ठीक होतं, पण काही दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोलाही त्याच घरात आणलं. मात्र नंतर त्याने पहिल्या पत्नीला खर्चासाठी पैसे देणे बंद केले.
पीडित महिला तिच्यासाठी व मुलासाठी मोल मजुरी करून चार पैसे कमावते आणि कसाबसा उदरनिर्वाह करते. मी जेव्हाही पतीकडे पैसे मागते, तो मला मारहाण करण्यास सुरूवात करतो, असे सांगत पीडितेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिस चौकशी करायला घरी तर आले, पण काहीच कारवाई केली नाही, असेही तिने सांगितले. आता पती आपल्याला हत्या करण्याचीही धमकी देत असल्याचेही तिने नमूद केले.
राजेशचे पहिले लग्न झाले आहे, त्याला एक मुलगा आहे, हे माहीत असूनही पूजाच्या (सवत) आई-वडिलांनी तिचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. आता ते एकाच घरात राहतात. एका खोलीत राजेश आणि पूजा तर दुसऱ्या खोलीत पीडित महिला तिच्या मुलासह राहते. कुसुमने सांगितले की, तिची सवत, आपल्या पतीलाही मारहाण करायची. आणि जेव्हा आपण तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने मध्ये न पडण्यास सांगत तिला धमकावले.