नाशिक : गुरांची वाहतूक (cattle) करणाऱ्या एका इसमाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते.
एका गटाने गुरांची वाहतूक करणाऱ्या 23 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचे समोर आले असून त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
10 जून रोजी अन्सारी यांचा मृतदेह इगतपुरी भागातील घाटनदेवी येथील घाटातून सापडल्यानंतर हा कथित गुन्हा उघडकीस आला, असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. ते बजरंग दलाशी संबंधित असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गुरांची अवैधरित्या वाहतुक होत असल्याचे समोर आले आहे.
8 जून रोजी अन्सारी हा इसम त्यांच्या दोन साथीदारांसह टेम्पोमधून गुरांची वाहतूक करत होता. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ सुमारे 10-15 कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर या गटाने टेम्पोचा ताबा घेतला आणि गाडी पुढे नेण्यापूर्वी चार गुरांची सुटका केली.
त्यानंतर त्यांनी एका निर्जन ठिकाणी टेम्पो थांबवून अन्सारी व त्याच्या दोन्ही साथीदारांना मारहाण केली. त्याचे इतर सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले, पण अन्सारी हा इसम निसटू शकला नाही. मात्र अन्सारी हा दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आरोपींनी केला आहे. मात्र पोलिसांना वेगळाच संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.