रेल्वे ही मुंबईची लाइफलाइन . रोज लाखो प्रवासी या रेल्वेतून प्रवास करत इच्छित स्थळी जात असतात. मात्र आता याच रेल्वेत महिलांसाठी प्रवास सुरक्षित राहिला आहे की नाही असा प्रश्न पडू लागला आहे. धावत्या रेल्वेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दादर ते बोरिवली ट्रेनदरम्यान एका अवघ्या 15 वर्षांच्या मुलीला नकोसा स्पर्श करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्या मुलीने या घटनेबाबत तिच्या वडिलांना सांगितल्यावर त्यांनी आरोपीला जाब विचारला असता, त्याने मुजोरपणे आणि उद्धटपण उत्तर देत वाद घातला. अखेर असे नकोसे चाळे करणाऱ्या त्या आरोपीला मुलीच्या वडिलांनी आणि इतर सहप्रवाशांनी चोप देत चांगलाच धडा शिकवलाय नूर असे आरोपीचे नाव असून या मारहाणीत जखमी झाल्यामुळे त्याच्यावर कूपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील अल्पवयीन पीडत मुलगी ही मुंबईतील उपनगरात राहते. दोन दिवसांपूर्वी ती वडिलांसोबत परळ येथे कामासाठी गेली होती. घरी परत जाण्यासाठी रात्रीच्या सुमारास तिने वडिलांसोबत दादर येथून ट्रेन पकडली. वडील सोबत असल्याने ती पुरुषांच्या डब्यात चढले आणि समोरासमोर असलेल्या सीटवर बसले.
वांद्रे येथे रेल्वे पोहचल्यानंतर आरोपी नूर त्यांच्या सीटजवळ आला आणि तेथे तिघे बसलेले असतानाही सीटवर बसू दे सांगत त्याने त्या मुलीला नकोस स्पर्श केला. यामुळे भेदरलेल्या मुलीने या घटनेची तक्रार समोरच बसलेल्या वडिलांकडे केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने उद्धटपणे उत्तरं देत वाद घालायला सुरूवात केली. हे पाहून तिचे वडील भडकले. मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या त्या आरोपीला त्या मुलीच्या वडिलांनी आणि इतर प्रवाशांनी पकडून चांगलाच चोप दिला.
ट्रेन अंधेरी येथे पोहोचल्यानंतर आरोपीने पळून जायचा प्रयत्न केला मात्र प्रवाशांनी त्याला पकडून अंधेरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. तसचे त्या पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीमुळे जखमी झालेल्या आरोपीवर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंत पोलिस त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करणार आहेत.