गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मात्र त्याच दरम्यान एक वेगळी बातमी समोर आली आहे. 29 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या इसमाला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याचं कारण ऐकाल तर तुम्ही अवाक् व्हाल. जामीन मंजूर होण्याचं कारण म्हणजे, तो माणूस त्या तरूणीसोबत लिव्ह इनमध्ये रहात होता. त्यावेळी केलेला सात अटींचा करार त्याने कोर्टात दाखवल्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलाय.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या कुलाबा भागात ही घटना घडली आहे. सदर इसम आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनरने लिव्ह इनमध्ये राहण्याचा एक करार केला होता, 11 महिन्यांसाठी तो करार झाला होता. लिव्ह इनचा करार आणि इतर सात करार त्याने कोर्टात सादर केले होते. त्या करारावर तो माणूस आणि तक्रारदार तरूणी या दोघांनीही सही केली होती. मात्र या सह्या पीडित तरूणीच्या नाहीत असा दावा तिच्या वकिलांनी केला.
पण तो करार पाहून सत्र न्यायालयाने अत्याचाराचा आरोप असलेल्या त्या इसमाला जामीन मंजूर केला.
या प्रकरणातील आरोपी सरकारी कर्मचारी असून तो 46 वर्षांचा आहे. तर तक्रारदार तरूणी 29 वर्षांची असून ती केअरटेकर म्हणून कार्यरत आहे. आरोपीने आपल्याला लग्नाचा वचन देऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप त्या तरूणीने लावला. मात्र लग्नाचा विषय काढला की तो काही ना काही कारणं देऊन टाळाटाळ करायचा, असाही दावा तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये केला. मात्र आरोपीने हे नाकारले आणि लिव्ह इनचा करार दाखवला. सात अटींचा करार या दोघांनी केल्याचं सदर आरोपीने सांगितलं. हा करारही न्यायालयात सादर केला. ज्यानंतर बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.आपल्या अशीलाला फसवण्यात आल्याचा दााव आरोपीच्या वकिलांनी केला आहे. तक्रारदार महिला आणि माझे अशील सहमतीने लिव्ह इनमध्ये राहात होते. त्यांच्यातला करार हे स्पष्ट सांगतोय, असा युक्तिवादही वकिलांनी केला.