कोरोना काळातील वादातून जीवघेणा हल्ला, मूठ तुटल्याने चाकू पाठीत अडकला; अंबरनाथ हादरले

| Updated on: Aug 14, 2024 | 2:49 PM

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथमध्ये गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे. सोमवारी रात्री अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना काळातील वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोना काळातील वादातून जीवघेणा हल्ला, मूठ तुटल्याने चाकू पाठीत अडकला; अंबरनाथ हादरले
Follow us on

जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या वडोळ गावात घडली आहे. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यात मारण्यात आलेल्या चाकूची मूठ तुटल्याने चाकू तरुणाच्या पाठीत अडकून गेला होता. शस्त्रक्रियेनंतर पाठीत अडकलेला चाकू काढण्यात आला आहे. या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या प्रकाराने अंबरनाथ प्रचंड हादरून गेलं आहे.

सोमवारी रात्री अंबरनाथच्या वडोळ गावात राहणारा सौरभ म्हात्रे हा जेवणाचं पार्सल घरी घेऊन जात होता. त्यावेळी रोहन जाधव उर्फ वाघ्या याने सौरभला थांबवून कोरोना काळातील वाद उकरून काढला. कोरोना काळात आपला वाद झाला होता त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं रोहनने सौरभला सांगितलं. मात्र मला घरी जायचं असून उशीर होत असल्याचं सौरभने त्याला उत्तर दिलं. यावेळी सौरभ बाईकवर बसून जात असताना रोहनने सौरभच्या पाठीत धारदार चाकू खुपसला. वडोल गावच्या सेंट जोसेफ शाळेजवळ हा प्रकार घडला.

अन् विव्हळत खाली कोसळला

हे सुद्धा वाचा

रोहनने पूर्ण ताकद एकवटून हा चाकू हल्ला केला. पण चाकूची मूठ तुटल्याने चाकू सौरभच्या पाठीतच अडकून गेला. या हल्ल्यामुळे सौरभ विव्हळतच खाली पडल्या. त्यामुळे रोहनने पलायन केलं. या हल्ल्यानंतर एकच बोंबाबोंब झाली. स्थानिकांनी सौरभला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया केली आणि चाकू काढला. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झालाय. याप्रकरणी रोहन उर्फ वाघ्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो फरार झाला असून अंबरनाथ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रोहनचा शोध सुरू

दरम्यान, सौरभची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे रोहन फरार झाल्याने कोरोना काळात या दोघांमधील वाद काय होता हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी रोहनचा शोध घ्यायला सुरू केला आहे. तसेच या सौरभकडूनही हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीला तात्काळ शोधून त्याला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.