अकोल्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. कारण बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्याला जीवघेणा ठरला आहे. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्यानं बेदम मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली एवढंच नव्हे तर त्याच्या चेहऱ्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. एवढंच नव्हे तर त्या चोरट्यानं त्या इसमाला जीव जाईपर्यंत मारलं. हा संपूर्ण प्रकार अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे असून प्रचंड खळबळ माजली आह.
अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म चारवर रेल्वेतून एक दांपत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ते पाहून त्या महिलेच्या नवऱ्याने त्या मंगळसूत्र चोराचा पाठलाग सुरू केला.
जवळपास आठशे ते नऊशे मीटर पर्यंत पाठलाग सुरुचं होता. अखेर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला खरा, पण त्या चोरट्याने हातात येईल त्या वस्तूने त्या इसमाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केली. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेले हेमंत गावंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.
मंगळसूत्र न्यायचं, पण नवऱ्याला कशाला मारलं?
या संपूर्ण घटनेनंतर त्या दुर्दैवी महिलेने थरार सांगितलं. माझ मंगळसूत्र न्यायचं होतं, तिथपर्यंत ठीक होतं, पण माझ्या नवऱ्याला का मारलं ? असा सवाल साश्रूनयनांनी तिने विचारला. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास सुरू केला असून आरोपीची सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी मिळवले. अवघ्या 24 तासात आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून परमार असं आरोपीचं नाव आहे, तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं होत?
16 मार्च रोजी रात्री 9 वाजता अकोट येथून हेमंत गावंडे आणि त्यांची पत्नी अकोलाकडे रेल्वेने निघाले होते. तर पावणेदहा वाजता सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म क्रमांक चारवर गाडी पोचली आणि गावंडे दांपत्य रेल्वेतून खाली उतरत असताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यानं पळ काढला आहे. या चोरट्याचा पाठलाग हेमंत गावंडे यांनी केला पण काही अंतरावर पोहोचल्यावर चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यादरम्यान गावंडे यांना बेदम मारहाण झाली, तसेच त्यांच्या डोक्यावर आणि चेहरा देखील ठेचून काढला. घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा अकोला पोलिस गांभीर्याने तपास करतायेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांचे पथकही दाखल झाले होते. दरम्यान, पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी या घटनेची माहिती घेत, तात्काळ आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या असून 24 तासात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात मारेकऱ्याला अकोल्याच्या एमआयडीसी भागातून अटक करण्यात आलीय. दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
प्लॅटफार्म 4, 5 आणि 6 वर CCTV कॅमेरा नाही?
अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर एकत्रित 6 प्लॅटफार्म आहेत. त्यापैकी 1, 2, आणि 3 या प्लॅटफार्म क्रमांकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. मात्र, 4, 5 आणि 6 प्लॅटफार्मवर अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशी माहिती समोर आली आहे. चोरीची घटना रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफार्मवर घडली असून तिथं CCTV नाहीत..!