डोंबिवली / सुनील जाधव (प्रतिनिधी) : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी (Banned) असताना देखील आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर तसेच कल्याण व आसपासच्या शहरात ट्रक, टेम्पोच्या माध्यमातून लाखोंच्या गुटख्याची तस्करी (Gutkha Smuggling) केली जात आहे. सण उत्सवाच्या काळात रात्री जागरण असल्यामुळे गुटख्याची जास्त मागणी होत आहे. यामुळे आता चक्क मध्य प्रदेशहून ट्रकमधून गुटख्याची वाहतूक सुरु असल्याची बाब पोलिसांच्या कारवाईत (Police Action) उघड झाली आहे.
मानपाडा पोलिसांनी एका ट्रकमधून तब्बल 37 लाख 81 हजाराचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडवली गावातील मैदानात गुटख्याने भरलेला ट्रक येणार गुप्त माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, पोलीस हवालदार विजय कोळी, देवा पवार राजेंद्र खिल्लारे, प्रविण किनारे, महेंद्र मंजा, दीपक गाडगे यांच्या पथकाने तपासणी केली.
पोलीस पथकाने सदर ठिकणी जाऊन संशयित ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता, त्या ट्रकमध्ये 14 लाख किमतीचा गुटख्याने भरलेला आढळून आला.
पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत ट्रक चालक अब्दुल सज्जाक अब्दुल रज्जाक चौधरी, ट्रकचा मालक मुन्ना उर्फ सफिक शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे.
ट्रकसह 14 लाखाचा गुटखा असा एकूण 37 लाखाच्या मुद्देमाल जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा गुटखा कोणाला वितरीत करण्यात येणार होता ? याचा तपास वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे करत आहेत.