डोंबिवली / सुनील जाधव : पोलिसांच्या खुर्चीवर बसून इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी रील बनवणे एका बिल्डरला महागात पडले आहे. मानपाडा पोलिसांनी विकासकावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर न्यायालयातून जामिनावर सुटका झाल्यानंतर आता झोन 3 पोलिसांनी त्याच्यावर तडीपार करण्याची कारवाई केली असून, आज त्याला नोटीस बजावत जिल्ह्याबाहेर पाठवले आहे. सुरेंद्र पाटील असे या विकासकाचे नाव असून, त्याच्यावर 7 गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई केल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.
सध्या स्वतःचे रिल बनवून व्हायरल करण्याचे फॅड जोरात सुरू आहेत. त्यासाठी लोक काहीही करत असतात. अशीच एक रील बनविण्यासाठी एक महाशय चक्क पोलीस ठाण्यात दाखल झाले. हे महाशय डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक असून, सुरेंद्र पाटील असे त्यांचे नाव आहे. पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील बनविल्याने खळबळ उडाली होती.
एका गुन्हा संदर्भात सुरेंद्र हा दिवाळीत मानपाडा पोलीस ठाण्यात गेला होता. तेव्हा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये कोणी नव्हते. याचा फायदा घेत पाटील याने खुर्चीवर बसून स्वतःची रिल बनवली. पोलीस ठाण्यातील रील व्हायरल होताच मानपाडा पोलीसांनी त्याची गंभीर दखल घेत त्याला अटक केली होती. मात्र त्याची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली.
यानंतर आता झोन 3 पोलिसांनी त्याच्यावर तडीपार करण्याची कारवाई केली असून आज त्याला पोलिसांनी नोटीस बजावत जिल्हा बाहेर पाठवले आहे सुरेंद्र पाटील असे त्यांचे या विकासकाचे नाव असून त्याच्या 7 गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई केल्याची माहिती डोंबिवली ACP सुनील कुराडे यांही दिली आहे.