नाशिक | 13 सप्टेंबर 2023 : नाशिकमध्ये एक तरूणाचा छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ (crime news) माजली. नाशिकरोड पोलिसांना दसक शिवारातील मलनिस्सारण केंद्राजवळ हा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने हा खून असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता, जी माहिती समोर आली त्याने सर्वांनाच धक्का बसला. प्रेमप्रकरणातूनच ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर गायकवाड असे तरूणाचे नाव असून तो ३४ वर्षांचा होता. पंचक येथे राहणारा ज्ञानेश्वर हा आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांत दाव घेऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही त्याचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली. पण त्याचा मृतदेहच हाती लागल्याने कुटुंबियांचा पायाखालची जमीनच सरकली.
हा मृतदेह कोणाचा याबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता, तो बेपत्ता झालेल्या युवकाचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून प्रेमप्रकरणातून हा गुन्हा घडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. अनैतिक संबंधांमुळे या युवकाचा काटा काढण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी मृत तरूणाची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना संशयावरून ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसचे या हत्येप्रकरणी इतर संशयितांचीही पोलिस चौकशी करत आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.