निनाद करमरकर, रायगडः रायगड (Raigad) जिल्ह्यातील माथेरान (Matheran) या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा आज विचित्र अपघात झाला. घाटातून कार चालवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने एर्टीगा कार रस्त्यावरून बाजूला झाली आणि थेट पलटी (Car Accident) झाली. सुदैवाने या कारमधील पर्यटकांना फार गंभीर इजा झाली नाही. मात्र कारचा हा विचित्र अपघात रस्त्यावरील सर्वांनाच धडकी भरवणारा ठरला.
प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनिमित्त माथेरानला फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. यापैकीच एका पर्यटकाच्या गाडीला आज भीषण अपघात झाला. माथेरानच्या घाटात विचित्र अवस्थेत ही एर्टीगा कार कोसळली. या कारमध्ये मुंबईहून आलेले दोन पर्यटक होते.
सुदैवाने पर्यटकांना फारशी इजा नाही. मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं. पोलीस आणि ग्रामस्थांकडून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
तर अन्य एका घटनेत तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघातात दुर्वैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच सोलापूरमधून ९ जण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. बुधवारी दर्शन घेऊन कनिपमकडे जात असताना कारने डिव्हायरला धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी आहेत.