नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका संशयित महिलेने पाच दिवसाच्या बाळाची चोरी केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मात्र अवघ्या 24 तासांच्या आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत त्या महिलेला ताब्यात घेऊन 5 दिवसांच्या बाळाला सुखरुपणे त्याच्या आईच्या कुशीत दिलं. पण ते मूल ज्या महिलेने पळवलं तिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सपना मराठे असं त्या आरोपी महिलेचं नाव असून ती अतिशय उच्चशिक्षित आहे. खूप प्रयत्न करूनही मूल होत नसल्यानेच सपनाने टोकाचं ऊल उचलत रुग्णालयातून ते मूळ पळवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनाही धक्का बसला.
प्रेग्नंट असल्याचं केलं नाटक
ही आरोपी महिला आणि तिचे पती हे दोघे धुळे येथे वास्तव्यास आहेत. एमबीएचे शिक्षण झालेल्या सपनाने लेखापाल पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून महिलेने इतर नातेवाईकांना आपण प्रेग्नेंट असल्याचं खोट सांगत नाटक केलं. आणि अखेरीस काल ती बाळ चोरी करून तिच्या घरी गेली. मात्र तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सपना मराठे ही खोटं बोलत असल्याचं समोर आलं आणि तिचा संपूर्ण बिंग फुटलं.
नेमकं काय झालं ?
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सटाणा तालुक्यातील सुमन खान या महिलेचे सिजर करून प्रसुती झाली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. या दरम्यानच उच्चशिक्षित असलेल्या सपना मराठे या महिलेने सुमन खान यांच्याशी ओळख करून खान यांचा विश्वास संपादन केला. त्यांना रुग्णालयातच नातेवाईक कामाला असल्याचं सांगितलं. त्यानंतर सुमन यांना ज्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता, त्या दिवशी त्यांचा पती रिपोर्ट आणण्यासाठी गेला होता. तेव्हा सपना ही त्या महिलेशी बोलली , मी बाळाला घेऊन पुढे जाते, तुम्ही मागून या तुमचे टाके दुखतील असं सांगत तिने ते बाळ घेतलं आणि पुढे गेली. मात्र त्या बाळाला वडिलांकडे न देता ती तिथून डारेक्ट पसार झाली. बाहेर आल्यावर सुमन यांना आपलं बाळ आणि ती महिला कुठेच दिसली नाही. ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सकरली. त्यांनी लगेच प्रशासनाकडे बाळ चोरी गेल्याची तक्रार केली…
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ हरवल्याची फिर्याद, त्याच्या वडिलांनी अब्दुल खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ विविध पथके रवाना केली. नाशिक गुन्हे शोध पथकाने अवघ्या बारा तासात बाळ शोधून आईकडे सोपवले. मात्र या घटनेत चोरी करणारी महिला आणि या बाळाचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून सोबत होते मात्र आईला व बाळाला डिस्चार्ज मिळाल्यावर चोरीची ही घटना घडली असे सांगत रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. प्रसूती झालेल्या महिलेनेच त्यांच्या संबंधित असलेल्या (आरोपी) महिलेकडे बाळ दिल्याचा दावा रुग्णालयाने केला.
असा लागला शोध
बाळ चोरीची तक्रार दाखल झाल्यावर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके या महिलेच्या मार्गावर होते. जिल्हाभरात पोलिसांचे पथक महिलेच्या तपासासाठी असतानाच पंचवटी येथील एका खाजगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली आणि तिच्या मागावर निघाले. ही महिला तीच, ( सपना) असल्याची खात्री पोलिसांना झाली.
सपना मराठे ही उच्चशिक्षित महिला मूळची धुळ्याची असून तिला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिची सखोल चौकशी केली असता बाळ चोरी का केले, याची त्या महिलेने कबुली दिली, ते ऐकून पोलिसही चक्रावले.बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचे ठरवले आणि बाळ चोरले,असे उघड झाले.
दरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मागील महिन्यात जिल्हा रुग्णालयातून बाळ अदलाबदल झाल्याची घटना घडली होती. आणि आता जिल्हा रुग्णालयातून थेट बाळच चोरी गेल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली. जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर, आरोग्य विभागाचा वचक आहे की नाही, असे एक ना अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या बारा तासात बाळ सापडले मात्र अशा कितीतरी घटना जिल्हा रुग्णालयात घडत असल्याने जिल्हा शल्यचिकित्तक जिल्हा रुग्णालय प्रशासनावर अंकुश ठेवण्यात किती यशस्वी ठरणार हे येणाऱ्या काळात समोर येईल.