आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त विनय कुमार चौबे यांचा मोका पॅटर्न जोरात सुरू आहे. चिखलीतील रेनवा टोळीवर ‘मोका’ची कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त चौबे यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये 36 गुन्हेगारांना मोकाचा दणका दिला आहे. यामुळे या टोळीतील गुंडांची चांगली बोबडी वळली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार आहे. ही निवडणूक भयमुक्त व पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पाडता यावी यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे .त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत चिखलीतील रेनवा टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम म्हणजेच मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
गेल्या तीन महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सात गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख निलेश रेनवा व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात चिखली, वाकड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, चोरी, खंडणी, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीमधील सदस्यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अतंर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून या गुन्ह्यामध्ये आणखी काही कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, तसेच पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आता पोलिसांच्या या कारवाईमुळे या टोळीला वचक बसेल अशी अपेक्षा आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.