कोटा : राजस्थानमधील कोटा येथे एका मेडिकलच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सहाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मयत विद्यार्थी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील रहिवासी आहे. कोटा येथे तो मेडिकलची तयारी करत होता आणि हॉस्टेलला राहत होता. मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.
हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावर मित्रांसोबत शुक्रवारी रात्री तो मोबाईलवर गेम खेळत होता. यानंतर 11.30 वाजण्याच्या दरम्यान तो रुमवर झोपायला जायला निघाला. याच दरम्यान चप्पल घालत असताना त्याचा तोल गेला अन् तो खाली कोसळला.
यात गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र आधी रुग्णालयात न्यायला अॅम्बुलन्स वेळेत मिळाली नाही, मग रुग्णालयात त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत.
रुग्णालयातील डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी उपकरणे नसल्याचे सांगितले. यामुळे जखमी विद्यार्थ्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. विद्यार्थ्याला दुसऱ्या रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये विसाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नमन मदान असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहे. नोएडातील सेक्टर 168 मध्ये गोल्डन पार्क सोसायटीत ही घटना घडली.