मुंबई | 23 डिसेंबर 2023 : बनावट ग्राहक बनून आलेल्या दोन भामट्यांनी एक ज्वेलर्सच्या शॉपमधून तब्बल 24 हजारांची सोन्याची चेन पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घाटकोपरच्या एम.जी.रोडवरील एका ज्वेलरी शॉपमध्ये ही चोरी झाली आहे. याप्रकरणी पीडित दुकानमालक,सुनील चोरडिया यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली असून त्या दोन्ही चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
आधी दुकानात शिरले आणि…
फिर्यादी सुनील चोरडिया यांचे घाटकोपर पश्चिम एमजी रोड येथे मोनालिसा नावाचे ज्वेलरीचे दुकान आहे. 19 डिसेंबर रोजी दुपारी साडेचारयाच्या सुमारास ते त्यांच्या दुकानात एकटे असताना दोन माणसं दुकानात आले आणि आपल्याला सोन्याची चेन विकत घ्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एकाने फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, तर दुसऱ्याने एक साधा टी-शर्ट घातला होता, असे चोरडिया यांनी सांगितले. आज मित्राचा वाढदविस असल्याने त्याला ₹ 25,000 ते 30,000 च्या दरम्यानची चेन विकत घ्यायची असल्याचे एका तरूणाने चोरडिया यांना सांगितले.
त्यानुसार, चोरडिया यांनी त्या दोघांना चार-पाच वेगवेगळ्या चेन दाखवल्या, त्यातून त्यांनी 3.900 ग्रॅम्सची एक सोन्याची चेन पसंत केली. त्याची किंमत साधारण 24,500 रुपये इतकी होती. त्या दोघांपैकी साहिल या व्यक्तीने लगेचच ती सोन्याची चेन गळ्यात घातली, तर त्याचा मित्र हा दुकानमालक चोरडिया याच्याशी बोलत होते. त्यांनी बिल तयार केल्यावर आम्ही Google Pay द्वारे पैसे देऊ असे त्यांनी सांगितले.
यूपीआय ॲप उघडले पण
त्यानंतर चोरडिया यांनी त्यांचे युपीआय ॲप उघडले आणि समोरच्या व्यक्तीला (पेमेंटसाठी) स्कॅनर दाखवला. पण त्या दुसऱ्या इसमाने चोरडिया यांच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर मागितला आणि आपण डायरेक्ट पेमेंट करू असे सांगितले. याने चोरडियांचा नंबर घेतला आणि दुकानात नेटवर्क लो असल्याचे सांगत तो बाहेर पडून रेंज शोधू लागला. थोड्याच वेळात चोरडिया यांना एक मेसेज आला आणि त्यांच्या खात्यात एका अज्ञात नंबरवरू 24,500 जमा झाल्याचे त्यांना समजले. चोरडिया यांनी त्या इसमाला जाऊन विचारणा केली असता, है पेसै आपल्या त्या दुसऱ्या मित्राने पाठवल्याचे त्याने चोरडिया यांना सांगितले.
त्याने चोरडिया यांच्याकडून बिल घेतले आणि तो दुकानाबाहेर पडला. तेव्हाच चोरडिया यांनी तातडीने त्यांच्या अकाऊंटमधील बॅलन्स चेक केला, मात्र खात्यात काहीच पैसे जमा झालेले नाहीत असे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानमालक चोरडिया यांनी त्या दोघांच्या मागे धाव घेतली. मात्र सोन्याची चेन घातलेला माणूस तेथील गल्लीतन निसटून जाण्यात यशस्वी ठरला तर दुसरा इसमा हा बाईकवर बसून पळून जाण्याचा प्रय्तन करत होता.
मात्र चोरडिया यांनी त्याला पकडले आणि खेचण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मोटरबाईक तेथेच सोडली आणि तोही घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर चोरडिया यांनी पोलिसांत धाव घेतली आणि सगळा प्रकार कथन करत चोरीची तक्रार नोंदवली. तसेच चोरडिया यांनी त्यांच्या दुकानात आणि दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांना दिले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असले तरी अद्यापही त्या चोरट्यांना पकडण्यात यश मिळालेले नाही. दरम्यान पोलिसांनी त्या चोरट्यांची बाईक जप्त केली असून तिच्या मालकाला शोधण्याचाही प्रयत्न करत आहेत.