लातूर : इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून मैत्री वाढवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. आरोपीने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाऊंट काढले आणि मैत्री केली. मग मुलीशी ओळख वाढवत तिला भेटायला बोलावले. मुलगी भेटायला आल्यानंतर आरोपीने पिडितेवर अत्याचार केले. यानंतर पिडितेने पोलिसांमध्ये धाव घेत सर्व घडला प्रकार सांगितला. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी आणि त्याच्या इतर तिघा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील 15 वर्षाच्या मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट होते. काही दिवसांपूर्वी या अकाऊंटवर समिना क्वीन नावाच्या अकाऊंटवरुन फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. मुलीने ती स्वीकारली. जवळपास आठवडाभर चॅटिंग केल्यानंतर तिला समोरुन भेटूया असा मॅसेज आला. त्यानुसार औसा येथील मॉलमध्ये भेटण्याचे ठरले. त्यानुसार मुलगी तिथे पोहचली. पण तेथे समिना नावाच्या मुलीऐवजी एक मुलगा होता. या तरुणाने समिना क्वीन मीच असल्याचे सांगत आपले नाव फेरोज जलील सय्यद असल्याचे सांगितले.
इन्स्टाग्रामवर ओळख असल्याने मुलीने त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरवात केली. यादरम्यान मुलाने चोरुन तिचे फोटो काढले. यानंतर त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तू माझी गर्लफ्रेंड हो नाहीतर मला गर्लफ्रेंड शोधून दे अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिली. यानंतर मुलीला औसा रोडवरील निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला.