नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप आश्रम शाळेतील बलात्कार प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. यामध्ये वेठबिगारीचा प्रकार समोर आलेला असतांना आता सातवा गुन्हा दाखल झाल्याची बाब समोर आली आहे. आधारश्रम सोडून गेलेल्या एका सज्ञान मुलीने पोलिसांत ही तक्रार दिली आहे. त्यावरून द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप आधारश्रमाचा संचालक हर्षल मोरे याच्यावर सातवा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीला पाय दाबण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर लैंगिग अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन हर्षल मोरवर पहिला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीसांनी हर्षल मोर याला अटक केली होती. त्यामध्ये हर्षल मोरे याने पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभर आधारश्रमाच्या धक्कादायक घटनेची चर्चा होऊ लागली होती.
म्हसरूळ येथील माने नगर परिसरात असलेल्या ज्ञानदीप आधारश्रमातील या संतापजनक घटनेप्रकरणी महिला बाल कल्याण विभागाने सात दिवसांच्या सात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक शहर पोलीसांच्या विविध पथकांच्या वतिने या प्रकरणाचा तपास केला जात असून यामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेठबिगारीचेही काम केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे,
जेवण झाल्यावर प्रत्येक मुलीला द्रोण बनविण्याचे काम दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हर्षल मोर याच्यावर बाल कामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
मात्र, वेठबिगारीचा गुन्हा दाखल होण्याबाबत चर्चा सुरू असतांना नराधम मोरेच्या विरोधात 9 वीच्या वर्गात शिकत असतांना एका मुलीने आधारश्रम सोडून दिले होते, त्यामुलीने आता पुढे येऊन तक्रार दिली आहे.
संबंधित मुलगी आता सज्ञान असल्याने तीने याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देत आपबीती सांगितली आहे, त्यानुसार त्याच्यावर सातवा गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याशिवाय सात दिवसांच्या आतमध्ये चौकशी अहवाल सादर करावयाचा असल्याने त्यात काय समोर येते हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.