बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी सरकारला धारेवर धरत आरोपी अक्षय शिंदे विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. मात्र बदलापूरची घटना उघडकीस येते न येत तोच राज्यातील अनके भागांतून अशा अनेक घटना उघडकीस येत चालल्या. कधी लपाछुपी खेळणाऱ्या मुलीवर तिच्या शेजारच्या काकांनी तर कधी स्वत:च्या पोटच्या मुलीवर तिच्या बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. हे कमी की काय म्हणून काही दिवसांपूर्वीच टिटवाळ्याजवळ अवघ्या दोन वर्षांच्या मुलीवरही एका नराधमाने अत्याचार केला. ती घराबाहेर खेळत असतानाच, त्याने तिला जबरदस्तीने बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घृणास्पद घटना ऐकून आपले हात कानावर जातात, पण गुन्हेगारांचे गुन्हे काही कमी होत नाहीत.
या सगळ्या घटना उघडकीस येत असतानाच आता डोंबिवलीमध्येही आणखी एक विनयभंगाची घटना समोर आली आहे. डोंबिवली स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर अवघ्या 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. मिळीलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणींसह शाळेतून घरी परत जात होती. ती स्टेशनजवळील स्कायकवर पोहोचली असता एका 19 वर्षांच्या तरूणाने अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे भेदरलेल्या मुलीने बचावासाठी आरडाओरडा सुरू केला, तिचा आवाज ऐकून स्कायवॉकवरील इतर सुजाण-सतर्क नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. आणि ते अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल यादव असे त्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी राहुलविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
दोन वर्षांची चिमुकली घराबाहेर खेळत होती, तिला सोडलं नाही..
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणजवळही अशीच एक अतिशय संतापजनक घटना घडली होती. घराबाहेर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीला अत्याचाराला बळी पडावं लागलं. अवघ्या दोन वर्षांच्या त्या चिमुकलीवर नराधम इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण जवळील टिटवाळा दहागाव परिसरातील संतापजनक घटना आहे. बाहेर खेळणारी ही मुलगी थोड्या वेळाने घरी रडत परत गेली, आई-वडिलांनी रडण्याचं कारण विचारल्यानंतर, भेदरलेल्या त्या चिमुकलीने कसंबसं काय घडलं ते सांगितलं आणि हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. हादरलेल्या पालकांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई करून अत्याचार करणाऱ्या नराधम विकृत आरोपीला अटक केली.