इंदूर | 28 जुलै 2023 : अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार (minor girl) करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंदूरच्या लसूडिया ठाणे क्षेत्रात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली असून तुरूंगात त्याची रवानगी करण्यात आली आहे. इंदूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुलीला दिल्या होत्या दहा-दहाच्या नोटा
ही दुर्दैवी घटना लसूडिया भागातील आहे. आरोपी जावेद हा ठेकेदार क्षेत्रातील असून गेल्या काही दिवसांपूर्वी तो एका कुटुंबाला मजदुरी करण्यासाठी घेऊन आला होता. त्यामध्ये आठ वर्षांची पीडित मुलगीही होती. आरोपीने त्या मुलीच्या कुटुंबियांना कामासाठी शहारबाहेर पाठवले आणि त्याच वेळी त्या छोट्या मुलीवर अत्याचार केला.
संध्याकाळी मजूराचे कुटुंबिय परत आल्यावर पीडित मुलीने त्यांना सर्व घटना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, या घटनेनंतर मुलीचे तोंड बंद ठेवण्यासाठी ठेकेदाराने तिला दहा-दहा रुपयांच्या नोटाही मुलीला दिल्या होत्या. तिच्याकडे हे पैसे कुठून आले हे पालकांनी वितारल्यावर त्या मुलीने सर्व घटना सांगितली आणि ठेकेदाराचा गुन्हा उघड झाला.
पोलिसांनी केली कारवाई
यानंतर मुलीच्या पालकांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. हा अत्याचार झाला तेव्हा पीडित मुलगी एकटीच घरी होती. याप्रकरणाची कोणाकडेही वाच्यता केल्यास जीवानिशी मरशील, अशी धमकीही आरोपीने दिली होती असे समजते.
या प्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपी जावेदला अटक केली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा संपूर्ण खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.