मुंबई : मुंबईतील मीरा रोड मर्डर केसमध्ये (Mira Road Murder Case) रोज नवनवे खुलासे होत असून आता मृत सरस्वती वैद्य हिच्या मोबाईलमधून पोलिसांना महत्वाचा पुरावा मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीने आरोपी मनोज सानेला (Manoj Sane) हा मेसेज पाठवल्यानंतरच तिला संपवण्यात आलं. तिच्या व्हॉट्सॲप चॅटवरून अनेक गोष्टींचा खुलास झाला आहे. असं नेमकं काय लिहीलं होतं त्या मेसेजमध्ये ?
पोलिसांच्या माहितीनुसार, सरस्वती हिला मनोज सानेशी असलेले सर्व संबंध संपवायचे होते. तिला या रिलेशनशिपमध्ये राहण्यात काहीही रस उरला नव्हता. 26 -27 मे रोजी सरस्वतीने तिच्या मोबाईलवरून मनोज सानेला व्हॉट्सॲप मेसेज केला होता. ‘ तू माझा विश्वास तोडला आहे… मला धोका दिलास, माझा विश्वासघात केलास, म्हणून मी तुझ्यासोबतंच नातं संपवत आहे ‘ असं तिने तिच्या मेसेजमध्ये लिहीलं होतं. त्यानंतर साधारण आठवड्याभराने तिचा मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सांगण्यानुसार, हा मेसेज मिळताच मनोज साने चांगलाच भडकला होता. या मेसेजनंतर ते दोघं एकाच फ्लॅटमध्ये राहूनही एकमेकांशी अत्यंत मोजक्या शब्दात बोलायचे, त्यांच्यात जास्त संवाद नव्हता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वतीने 26 मे रोजी मनोज साने याला दुसऱ्या महिलेशी चॅट करताना पकडले होते. त्यानंतर दोघांमध्ये बराच वादही झाल्याचे समजते. तेव्हापासूनच आरोपी साने भडकलेला होता.
सरस्वतीच्या मोबाईलमधील हे व्हॉट्सॲप चॅट्स हाता लागल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहे. आरोपी साने याचे चरित्र चांगले नव्हते आणि सरस्वतीला त्याच्यासोबत राहण्यात रस नव्हता, हेही यावरून स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत या हत्याकडांत अनेक नवनवे आणि तितकेच धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी मनोज सानेच्या फोनचीही तपासणी केली असून त्यातूनही महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
मनोजी साने याने अतिशय नियोजनबद्ध रितीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने वेबसीरिज पाहून सरस्वतीच्या हत्येची योजना आखली होती. तसेच मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी यासाठी त्याने गूगलवर सर्चही केले होते.