ठाणे : आता एक मोठी बातमी पुन्हा राज ठाकरेंबद्दल (Raj Thackeray). मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातल्या (Thane) नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. राज ठाकरेंची काल ठाण्यात सभा झाली. ह्या सभेत राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना भगवी शाल देण्यात आली होती आणि नंतर लगेचच तलवारही. भेट दिलेली तलवार राज ठाकरेंनी सभेला दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशाच प्रकारचा गुन्हा काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांवर मुंबईतही दाखल केला गेला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झालाय.
सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाखवणे, उगारणे यासंदर्भात कायद्यात तरतुदी आहेत. अशा प्रकारचे गुन्हे महाविकास आघाडीत मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड तसेच अस्लम शेख यांच्यावरही दाखल झाले होते. यासंदर्भात भाजपा नेते मोहित कंबोज यांनी तक्रार दाखल केली होती.
कालच्या सभेत विरोधकांवर आणि वादग्रस्त विषयांवर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्यावर आधीच केसेस आहेत, अजून एखादी पडली तरी काही बिघडत नाही. अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला, तर त्यात काही वेगळे, असे काल म्हणाले होते.
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जालन्यात छावा संघटनेनं पोलिसात तक्रार दिलीय आहे. मागच्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम समाज गुण्या गोविंदाने राहत आहेत. मात्र राज ठाकरे हे बेताल वक्तव्य करून स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी जातीय दंगली घडवत आहेत. रमजान महिना सुरु असताना मशिदींवरील भोंग्यांवर राज ठाकरे दंगली घडवण्यासारखी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून त्यांच्या सभेला बंदी घालण्यात यावी ,अशी तक्रार छावा संघटनेनं पोलिसात केली आहे.
संबंधित बातम्या :
तलवार दाखवणं भोवणार? राज ठाकरेंवर ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता