नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : आजच्या जमान्यात माणुसकी दुर्मिळ झाली आहे. एखादा अपघात झाला, कोणी जखमी झालं की त्याला मदत करायचं सोडून लोकं त्यांचे फोटो, व्हिडीओ काढत बसतात. मदतीसाठी सहसा कोणी पटकन पुढे येत नाही. पण असं सगळीकडे नाही. माणूसकीवर पुन्हा विश्वास बसेल अशी घटना राजधानी दिल्लीजवळ घडली आहे. एका मोबाईल स्नॅचरचे (चोर) त्याच्या बाईकवरील नियंत्रण सुटले आणि तो धाडकन खाली कोसळून अपघात झाला. पण विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या मदतीसाठी जो माणसू धावू आला तो विशेष होता. त्या चोराने काळी क्षणांपूर्वीच त्या माणसाचा मोबाईल चोरून पळ काढला होता आणि पुढे जाऊन त्याचा अपघात झाला. पण त्या माणसाने पुढचा मागचा काहीच विचार न करता त्या मोबाईल चोराच्या मदतीसाठी धाव घेतली आणि तो त्याला घेऊन रुग्णालयातसुद्धा गेला.
गुडगावजवळील आयएमटी मानेसर जवळ सेक्टर 8 येथे गेल्या सोमवारी संध्याकाळी 6-6.15 च्या सुमारास हा प्रकार घडला. हैराण करणारी ही घटना आहे ना, पण त्यामुळे जगात माणुसकी नावाचा प्रकार अद्यापही आहे, हेच अधोरेखित होते. प्रमोद असे त्या तरूणाचे नाव आहे. तो एका कापज उत्पादक कंपनीत काम करतो. त्या दिवशी संध्याकाळी तो मित्रांसोबत घरी परत येत होता, तेव्हाच ही घटना घडली.
मोबाईल चोराचा झाला अपघात
त्या घटनेचे वर्णन करताना प्रमोद म्हणाला, ” मी रस्त्याच्या कडेला उभा राहून फोनवर बोलत होतो, तेवढ्याच डीआरआय चौकातून यामाहा R15 बाईकवर वेगाने एक माणूस आला आणि माझा फोन हिसकावला. भरधाव वेगाने त्याने बाईक पुढे दामटली. पण सुमारे 200 मीटर पुढे गेल्यावर त्याची बाईक अचानक घसरली आणि तो धाडकन जमीनीवर पडला.” तो चोर खाली पडताच प्रमोद लगेच त्याच्या दिशेने धावला. तो माणूस बेशुद्ध पडला आणि गंभीर जखमीही झाला होता. ते पाहून प्रमोद याने लगेचच 112 नंबरवर कॉल करून मदत मागितली. तो चोर काहीच बोलू शकत नव्हता, पण तेवढ्यात प्रमोदला त्याच्या कंबरेला बांधलेल्या बॅगमध्ये त्याच चोरलेला फोन दिसला. पोलिस येताच प्रमोदन सर्व घटना कथन केली आणि त्या चोराला तातडीने अँब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आले.
डोकं, कपाळ, तोंडाला गंभीर जखम
मानेसर पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा चोर सुमारे 25 वर्षांचा तरुण आहे. बाईकवरून पडून झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला, तोंडाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. “तो गंभीर जखमी झाला असून त्याला पोलिसांच्या देखरेखीखाली सेक्टर 10 मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत आणि आम्हाला त्याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र सापडले नाही,” असे पोलिसांनी सांगितले.
फोन चोरीला गेल्यानंतर प्रमोद कुमार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ए (चोरी) अंतर्गत एफआयआर नोंदवला. गुन्हेगार अद्याप जखमी असून तो जबाब देण्यास असमर्थ आहे, त्यामुळे तपासात काही अडथळे येत आहेत. मात्र त्या चोराकडून पोलिसांनी फक्त प्रमोदचा फोनच नाही तर आणखी पाच मोबाईलही जप्त केले.