नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एका सुंदर मॉडेलच्या हत्येमुळे गुडगांव हादरलं. गुडगावच्या एका हॉटेलमध्ये मॉडेल दिव्या पाहुजा हिची गोळ्या मारून हत्या करण्यात आली. दिव्या पाहुजाला अभिजीत सिंग यानेच मारल्याचा आरोप करण्यात आला. हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दिव्याच्या मृतदेहाचा कसून शोध घेण्यात येत होता, पोलिस सातत्याने तपास करत होते, पण मृतदेह काही सापडत नव्हता. अखेर या हत्याकांडाच्या तब्बल 11 दिवसानंतर दिव्या हिची डेडबॉडी सापडली. हरियाणातील फतेहाबादमधील तोहानाच्या कालव्यात दिव्या हिचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.
2 जानेवारी 2024 रोजी गुरुग्राममधील हॉटेलमध्ये दिव्या पाहुजाची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर 11 व्या दिवशी मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अभिजीत सिंग याला अटक करून त्याची चौकशी केली आहे. अभिजीत सिंग याच्यासह आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली होती.
दिव्या पाहुजाच्या हत्येप्रकरणी आणि विशेषत: तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भात, हॉटेलच्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेजवरून अशी माहिती समोर आली की, अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी मिळून दिव्याचा मृतदेह बीएमडब्ल्यूच्या डिकीमध्ये ठेवला आणि त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांच्या सांगण्यानुसार, दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अभिजीतने त्याची बीएमडब्ल्यू कार दिल्याचे आणि त्याच्या दोन साथीदारांना दहा लाख रुपये दिले होते. पोलिसांच्या चौकशीत त्याने ही कबुली दिली. त्याचा साथीदार बलराज गिलने याने दिव्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले होते.तेव्हा त्यांच्यासोबत दुसरा मित्र रवी बंगाही होता. दोघांनी मिळून दिव्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघेही पळून गेले. मात्र रवि बांगा हा अद्यापही फरार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
सात वर्ष जेलमध्ये होती दिव्या
मुंबईतील एका हॉटेलमध्ये हरियाणाचा गँगस्टर संदीप गडोलीचे एनकाऊंटर झाले होते. त्यानंतर मॉडेल दिव्या पाहुजा ही सात वर्षांसाठी तुरुंगात होती, काही महिन्यांपूर्वीच तिला जामीन मिळाला होता. यानंतर मंगळवारी, २ जानेवारीच्या रात्री, दिव्याची गुरुग्राममधील हॉटेलमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी पोलिसांनी ही माहिती दिली. 27 वर्षीय दिव्यावर मंगळवारी रात्री हॉटेलच्या खोलीत गोळ्या झाडण्यात आल्या.
त्या हॉटेलचा मालक अभिजीत सिंगचे काही आक्षेपार्ह फोटो दिव्याकडे होते, त्याचाच वापर करून की अभिजीतला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पण दिव्याच्या कुटुंबीयांनी हा आरोप फेटाळून लावला.