औरंगाबादः शहरात धक्कादायक घटना घडलीय. थकीत वीजबील वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ, दमदाटी करीत पळवून लावल्याची घटना घडलीय. शिवाय या पथकावर दगड भिरकावल्याचेही पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र महिनोंमहिने वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांकडून वसुली करण्यासाठी जाणाऱ्या पथकाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
औरंगाबाद मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला. या परिसरात वेगवेगळ्या गल्लीत कारवाई करीत असतानाच दोघांनी महावितरणच्या पथकावर दगड भिरकावले आणि हुसकावून लावले, अशी तक्रार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावरून मुकुंदवाडी ठाण्यात अशोक भातकुडे आणि रामेश्वर निकाळजे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणचे चिकलठाणा विभागाचे सहाय्यक अभियंता विजय गणेश काथार हे 11 जानेवारीला आपला कर्मचाऱ्यांसोबत तीन पथक करुन संयजनगरात कारवाईसाठी गेले. त्यावेळी गल्ली क्र. 15 मध्ये कारवाई करीत असताना आरोपी रामेश्वर निकाळजे आणि अशोक भातकुडे त्यांच्याकडे गेले. त्यांनी लगेचच येथून निघून जा नसता गल्लीतून बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी देत दगड घेऊन त्यांच्यावर भिरकावले. ते बाहेर पडताच आरोपंनी शाम मोरे यांच्या पथकाकडे मोर्चा वळविला. त्यांना गल्ली क्र 14 मधून हुसकावले. त्यानंतर आरोपी काथार यांच्या पथकाकडे गल्ली क्र. 21 मध्ये गेले. त्यांना धक्काबुक्की करुन मीटर जप्ती करण्यापासून रोखले. तसेच, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
इतर बातम्या-