सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. पुण्यामध्ये भरदिवसा हत्या, हत्येचा प्रयत्न होत असे गुन्हे घडत आहेत. 5 जानेवारी 2024 ला शरद मोहोळ याची घराजवळच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहोळ याच्या हत्येने परत एकदा पुणेकर हादरले होते. मोहोळ याचा खून हा गँगवारमधूनच झाला हे काही दिवसांनी पोलीस तपासामध्ये समोर आलं. या सगळ्याचं मुळ म्हणजे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका ठरत आहे. मुळशी तालुक्याची ओळख आता गुन्हेगारांचा तालुका अशी झाली आहे. याच तालुक्यामधील टोळी युद्धामुळे पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. शरद मोहोळच्या हत्येागील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याचं नाव समोर आलं आहे. हाच गणेश मारणे ज्याने याआधी शरद मोहोळ याचा सख्खा चुलत भाऊ आणि मोहोळ टोळीचा म्होरक्या असलेल्या संदीप मोहोळला त्याने संपवल होतं. या टोळीयुद्धाची सुरूवात का झाली आणि या टोळ्या का निर्माण झाल्या? मुळशी पॅटर्नचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्या.
पुण्यातील टोळीयुद्धाची सुरूवात MIDC मुळे झाली. सातबारे रिकामे करत कंपन्यांना जागा उपलब्ध करुन देणे. कंपनीचा स्क्रॅप उचण्यापासून ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी वर्चस्वाच्या लढाईसाठी भूमिपुत्र एकमेकांच्या विरोधात कोयते, बंदूका घेऊन एकमेकांना संपवू लागले. मुळशी तालुक्यामधील मुठा गावामधील संदीप मोहोळ हा बोडके टोळीमध्ये होता. मोहोळने ओळखलं होतं की जमिनीच्या व्यवहारांमध्ये चांगला पैसा आहे. संदीप उर्फ सँडी याने आपली दहशत वाढवण्यासाठी अनिल मारणे सुधाकर रसाळ यांचे मर्डर केले होते. सँडीने आपली टोळी तयार केली त्यावेळी मारणे टोळी सुद्धा चांगली सक्रिय होती. गणेश मारणे याने संदीप मोहोळला मारण्यासाठी प्रयत्न केले पण अनेकवेळा तो वाचला. एक दिवस आला 4 ऑक्टोंबर 2006 ला गणेश मारणेने आपल्या साथीदारांच्या मदतीने संपवलं.
पुण्यामधील पौड फाटा येथील गणपती मंदिराजवळ सिग्नलला गाडीमध्ये असलेल्या संदीप मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आधी हातोड्याने त्याच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यानंतर गोळ्या घालून ठार केलं. या हत्या प्रकरणामध्ये एकूण 18 जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले होते. या खटल्याचा निकाल 14 वर्षे तीन महिने आणि अठरा दिवसांनी निकाल लागला होता. या हत्या प्रकरणात सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे या तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. या खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणे, राहुल तारुसह 13 जणांची निर्दोष मुक्तता केली होती.
या हत्येचा निकाल लागण्याआधी संदीप मोहोळ याचा चुलत भाऊ शरद मोहोळ टोळीचा म्होरक्या झाला होता. शरद मोहोळ याने आपल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून मारणे टोळीचा कथित सुत्रधार किशोर मारणे याला संपवलं. संदीप मोहोळ याच्या हत्ये प्रकरणात गणेश मारणे आतमध्ये गेला होता. त्यानंतर किशोर मारणे टोळीची सुत्र चालवत असल्याचं बोललं जातं. शरद मोहोळने 11 जानेवारी 2010 ला पुण्यामधील निलायम या चित्रपटगृहात किशोर मारणे हा नटरंग चित्रपट पाहायला येत असल्याची मोहोळला पक्की खबर मिळाली. मोहोळने आपल्या साथीदारांना घेत ट्रॅप लावला.
चित्रपट पाहून बाहेरील प्लटिनम हॉटेलमध्ये किशोर मारणे चहा पिण्यासाठी गेला. चहा पिऊन झाल्यावर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर किशोर मारणे याच्यावर कोयत्याने 40 वार करण्यात आले होते. शरद मोहोळने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेतला. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला. हत्येच्या खटल्याचा निकाल 2016 ला लागला यामध्ये शरद हिरामण मोहोळ, अमित अनिल फाटक, दीपक गुलाब भातंमब्रेकर, दत्ता किसन गोळे, योगेश भाऊ गुरव, हेमंत पांडुरंग धाबेकर, मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख अशी शिक्षा झालेल्यांची नावे होतीत.
गणेश मारणे तुरूंगातून बाहेर आल्यावर पुण्यातील डेक्कन परिसरातील खिलारे वस्तीमध्ये राहू लागला होता. गेले काही दिवस तो अजिबात चर्चेत नव्हता पण शरद मोहोळ याच्या मर्डरमध्ये त्याचं नाव समोर आलं. शरद मोहोळ याचा मर्डर हा एकदम प्लॅन करून करण्यात आला. मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणारा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा नामदेव कानगुडे याचा भाचा होता. शरद मोहोळ याच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर कानगुडे याचं गाव आहे.
मोहोळच्याच गँगमध्ये काम करणाऱ्या कानगुडेचं मोहोळसोबत काही कारणावरून त्यांचं वाजलं होतं. मोहोळ त्यावेळी कानगुडे याचा अपमान केलेला, तेव्हा मोहोळच्या घरातून तो रडत बाहेर गेला. मामाच्या डोळ्यातील पाणी पाहणारा मुन्ना आतून पेटला होता. या अपमानाची ठिणगीच मोहोळच्या मर्डरचं मुख्य कारण ठरलं. मोहोळच्या गँगमध्ये असं काही झालं आहे याची विठ्ठल शेलार याला खबर लागली. मुळशीच्या भाईने सूत्र फिरवलीत. गणेश मारणे विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांनी एकत्र येत प्लॅन करत मुन्ना पोळेकरला मोहोळच्या गँगमध्ये पेरला. मुन्नानेही मोहोळच्या जवळच्या पोरांच्या मदतीने गँगमध्ये एन्ट्री केली. काही दिवसातच त्याने मोहोळचाही विश्वास जिंकला.
मोहोळवर याआधीही अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण काही यशस्वी झाला नाही. 5 जानेवारी 2024 ला शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. मुन्नानेही मोहोळच्या घरी जेवण केलं त्यानंतर मोहोळ दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार होता. हीच संधी साधली आणि त्याने आपल्या साथीदारांना बाहेर बोलावून घेतलं. मोहोळ जसा बाहेर पडला त्यावेळी साहिलने मागून पहिली गोळी मारली. त्यानंतर साथीदारांनी गोळ्या मारल्या, शेवटची चौथी गोळी मुन्नाने मोहोळच्या छातीत मारली.
आता पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांना अटक केली आहे. मात्र गणेश मारणे अद्याप फरार आहे. पोलिसांनी या मर्डरमध्ये एकूण 24 जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र आता हे टोळीयुद्ध थांबणार की आणखीन पेट घेणार माहित नाही पण पुढाऱ्यांनी याला खतपाणी नाही घातलं पाहिजे. नाहीतर जनता जनार्दन याचा वचपा निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही.