Rupal Ogrey murder : ज्या चाकूने केली हत्या, अखेर तो सापडलाच; अशा ठिकाणी लपवून ठेवलं होतं शस्त्र…

| Updated on: Sep 07, 2023 | 10:24 AM

रविवारी मरोळमध्ये घडलेल्या एका हत्येने संपूर्ण शहर हादरलं. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत मारेकऱ्याला तर पकडलं, पण हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र बराच काळ सापडत नव्हतं. अखेर...

Rupal Ogrey murder : ज्या चाकूने केली हत्या, अखेर तो सापडलाच; अशा ठिकाणी लपवून ठेवलं होतं शस्त्र...
Follow us on

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : मरोळ.. पॉश एरिआतील एका इमारतीतील रविवारची निवांत संध्याकाळ. सगळे जण आराम करून नव्या आठवड्याच्या तयारीला लागले. मात्र तेवढ्यात एक खळबळ माजवणाऱ्या घटनेचा खुलासा झाल्याने सर्वच हादरले. याच इमारतीत राहणाऱ्या एका तरूणीची हत्या (air hostess murder) झाल्याचे समोर आले. छत्तीसगडवरून आलेली रुपल ओगरे ही ट्रेनी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. मात्र रविवारी सकाळी एका नराधमाने तिची चाकूने गळा (knife) चिरून निर्घृण हत्या केली. मात्र हा गुन्हा उघडकीस यायला रविवारची रात्र उजाडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या २४ तासांच्या आतच मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या. मात्र त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू काही काही मिळत नव्हता. अखेर तीन दिवसांच्या तपास मोहिमेनंतर पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र (weapon recoverd) जप्त केले आहे.

विक्रम अटवाल (वय ४०) असे आरोपीचे नाव असून तो मृत तरूणीच्या इमारतीत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. हत्येच्या काही दिवस आधीच त्याचे व पीडितेचे भांडण झाले होते. स्वच्छता नीट न केल्याने ती त्याला ओरडली. आरोपी विक्रमने याचा राग मनात धरून ठेवला आणि तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने तो रविवारी तिच्या घरातच घुसला. पीडितेची बहीण व फ्लॅटमेट गावाला गेल्याने ती तेव्हा घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयशी ठरल्यानंतर पीडितेने आपले तोंड उघडू नये म्हणून त्याने तिची चाकूने गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले. हत्येनंतर त्याने बिल्डींगच्या बाहेर असलेल्या एका झाडामागेच तो चाकू लपवून ठेवल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी तो चाकू जप्त केला आहे.

पोलिस आरोपीला पुन्हा घटनास्थळी घेऊन गेले

स्थानिक न्यायालयाने अटवालची कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. बायको, दोन मुलं असा परिवार असलेला विक्रम अटवाल हा पवईतील चांदिवली येथील तुंगा गावातील रहिवासी आहे. गुन्हा कसा घडला हे समजून घेण्यासाठी पोलिस त्याला पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणी, रुपलच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेले होते. तेथे त्यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. त्यानंतर विक्रमने त्यांना हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र कुठे लपवले ती जागाही दाखवली, तेथून तो चाकू जप्त करण्यात आला.

मृत तरूणी ही मूळची छत्तीसडची होती. एका आघाडीच्या एअर लाइन्स कंपनीत ट्रेनी एअर होस्टेस म्हणून काम करण्यासाठी ती एप्रिल महिन्यात मुंबईत आली होती. गुन्ह्याच्या दोन दिवसांपूर्वीच तिचे आरोपी अटवालशी भांडण झाले होते. आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर केले असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. रुपलवर अत्याचार करण्याच्या हेतून आपण रविवारी तिच्या घरी गेलो होतो, मात्र तिने जोरदार विरोध केला. ती घराबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अखेर तिचा गळा चिरून तिची हत्या केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर तो तिचा मृतदेह बाथरूममध्ये सोडून पळून गेला. गुन्हा घडल्यावर अवघ्या 14 तासांच्या आत पोलिसांनी त्याला शोधून काढले.

आरोपी विक्रम अटवालच्या शरीरावरही अनेक जखमा आणि नखांचे ओरखडे आढळले. रुपलने त्याला जोरदार प्रतिकार केल्याचे त्यातून सिद्ध होते. मात्र तपासाचा भाग म्हणून त्याची जखमांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.