Mumbai Crime : ऑन-ड्युटी ट्रॅफिक पोलिसावर चालवली रिक्षा, मुजोर ड्रायव्हर अखेर ताब्यात

| Updated on: Jul 25, 2023 | 10:24 AM

ज्या रिक्षाने कराड यांना ठोकलं त्याची नंबर प्लेट त्यांना आठवत होती, त्यामुळे आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेण्यास पोलिसांना मदत झाली.

Mumbai Crime : ऑन-ड्युटी ट्रॅफिक पोलिसावर चालवली रिक्षा, मुजोर ड्रायव्हर अखेर ताब्यात
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : ऑन-ड्युटी ट्रॅफिक पोलिसाला (on duty traffic police) रिक्षाने टक्कर देत त्यांना गंभीर जखमी करून नंतर फरार झालेल्या मुजोर रिक्षाचालकाला (auto driver detained) अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडाळा-चेंबूर लिंक रोड (WCLR) येथे रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. सुखदेव कराड (वय 55) असे जखमी पोलिसाचे नाव असून ते अँटॉप हिल वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी रविवारी ते WCLR येथे ड्युटीवर होते. दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांना आहुजा पुलाच्या दिशेने एका रिक्षा येताना दिसली. मात्र ट्रॅफिक नियमांनुसार, ती रिक्षा चुकीच्या दिशेने येत होती. त्यानंतर कराड यांनी इशारा करत रिक्षाचालकाल परत फिरण्यास सांगितले. मात्र वकास तय्यबली शहा (वय 22) याने रिक्षा थांबवली नाही ना तो परत फिरला. उलट त्याने कराड यांच्या दिशेनेच वेगाने रिक्षा पुढे नेण्यास सुरूवात केली. मात्र तो पुढे जाऊ नये यासाठी कराड रस्त्याच्या मध्ये उभ राहून त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात आरोपी वकास याने वेगाने रिक्षा पुढे नेली आणि कराड यांना ठोकर मारली.

आरोपी झाला फरार

वेगाने आलेल्या रिक्षाच्या धडकेमुळे कराड हे गंभीर जखमी झाल्याने धाडकन जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपी तेथून लगेच फरार झाला. कराड यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने जवळच्याच रुग्णालयात दाखल केले. उपचारांनंतर कराड यांनी वडाळा टीटी पोलिस स्टेशन येथे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

सुदैवाने कराड यांना आरोपी शहा याच्या रिक्षाची नंबरप्लेट आठलत होती, त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यास मदत झाली. नंबरप्लेटच्या आधारे त्याचा कसून शोध घेण्यात आला व अखेर सोमवारी आरोपी शहा याला ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.

मुजोरपणे रिक्षा चालवत ट्रॅफिक पोलिसालाच जखमी करणाऱ्या शहा याच्या विरोधात 332 , 353 या कलमाअंतर्गत तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे समजते.