भांडण मिटवायला गेला तो थेट रुग्णालयातच पोहोचला, मुंबईत 22 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार

| Updated on: Nov 01, 2024 | 2:20 PM

सायन कोळीवाड्यात २२ वर्षीय विवेक गुप्ता या तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. जुना वाद कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.  

भांडण मिटवायला गेला तो थेट रुग्णालयातच पोहोचला, मुंबईत 22 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार
क्राईम न्यूज
Follow us on

Mumbai Sion koliwada Crime : राज्याची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत सध्या गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. आता नुकतंच सायन कोळीवाड्यात एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांना ताब्यात घेतले असून सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन कोळीवाड्यातील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री 12.30 च्या सुमारास एका 22 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. विवेक गुप्ता असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत विवेक गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र नगर परिसरात रात्री उशिरा काही लोक आवाज करत मोठा गोंधळ करत होते. यामुळे विवेक आणि त्यांचा वाद झाला. सुरुवातीला त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरु होती. मात्र काही वेळातच हा वाद टोकाला पोहोचला. यानंतर काहींनी विवेकवर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पोलीस उपनिरीक्षक केदार उमाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आर मोहन देवेंद्र याचा मोनूसोबत वाद झाला होता. हे भांडण विवेकने सोडवले होते. याच राग मनात धरुन विवेकवर कार्तिकने संगणमताने त्याच्या मित्रासोबत हा हल्ला केला. रात्री १२.५० च्या सुमारास विकी, कार्तिक, कार्तिकची पत्नी आणि इतर लोकांनी त्याला मारहाण केली. तर त्यातील एकाने धारदार चाकूने विवेकच्या छातीवर, पोटावर,पाटीवर आणि हातावर धारदार वार केले.

पाच जण ताब्यात

त्यांच्याविरोधात कलम 490/24 u/s 189(2), 189(4),191(2),191(3),190,103(2),118(1),352,351(2), सेक्शन ३१ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी 7.45 ला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक आर मोहन देवेंद्र, कार्तिक कुमार देवेंद्र, विकी मुत्तु देवेंद्र, मिनीअप्पण रवी देवेंद्र आणि कार्तिक आर मोगन ची पत्नी या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत.