‘या’ चोराने फेस आणला… अटक केल्यावर पुन्हा पळाला, पोलीसही थक्क; आता तर…

| Updated on: Oct 16, 2023 | 2:26 PM

आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. असून त्याने आत्तापर्यंत दादर, माहीम, अंधेरी आणि केळवा अशा विविध ठिकाणी झालेल्या बॅग आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे आढळून आले

या चोराने फेस आणला... अटक केल्यावर पुन्हा पळाला, पोलीसही थक्क; आता तर...
Follow us on

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : एका बॅगचोराने पोलिसांच्या नाकीनऊ आणले. बॅग चोरीच्या आरोपाखाली (bag theft) त्याला अटक तर करण्यात आली, पण पोलिसांना गुंगारा देऊन सटकला. अखेर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करत बेड्याच ठोकल्या. ४८ वर्षांच्या या आरोपीला मिरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) गुन्हे शाखा युनिट-३ ने पुन्हा पकडले, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश उर्फ ​​मनीष यशवंत पार्टे असे आरोपीचे नाव आहे. विरारच्या मानवेलपाडा येथील रहिवासी असणाऱ्या मनीष पार्टे याला बॅग चोरीच्या गुन्ह्यात 5 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. पण 8 ऑक्टोबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

रुग्णालयात नेतानाच झाला फरार

नियमित वैद्यकीय तपासणीसाठी पार्टे याला सरकारी रुग्णालयात नेले जात होते. तेव्हा त्याने एका पोलिसाला प्रतिकार केला आणि कोठडीतून पळ काढत तो फरार झाला. याप्रकरणी विरार पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 224 अंतर्गत त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील या प्रकरणाचा समांतर तपास करायला सुरूवात केली.

पोलिसांना गुंगारा देऊन एक आरोपी पळून गेल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ही घटना गंभीरतेने घेत त्यांनी ताबडतोब फारा आरोपीला अटक करण्यासाठी प्लानिंग सुरू केले. गुन्हे शाखा युनिट-3 ने निरीक्षक प्रमोद बदक यांच्या नेतृत्वाखाली एक पोलिस पथक तयार केले. त्यांनी तांत्रिक विश्लेषण करत आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फरार आरोपी पार्टेचा माग काढला.

अखेर 14 ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या पथकाने यशस्वी कामगिरी करत मंगेश उर्फ मनीष पाटे याला बोरीवली स्टेशनमधून अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. असून त्याने आत्तापर्यंत दादर, माहीम, अंधेरी आणि केळवा अशा विविध ठिकाणी झालेल्या बॅग आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

एवढेच नव्हे तर चोरीच्या गुन्ह्यातील सहभागासोबतच आरोपीवर खुनाशी संबंधित गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली. सध्या आरोपी विरार पोलीसांच्या ताब्यात असून त्याच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलली आहेत. संशयित आरोपीला यशस्वीरित्या अटक करण्यात आली आणि नंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी गुन्हे शाखा युनिट-3 ने स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल,असे पोलिसांनी सांगितले.