मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : मुंबईत गेल्या महिन्यांपासून गुन्हेगारी कारवाया होत असून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. याचदरम्यान ब्बल २ कोटींचा चरस साठा घेऊन आलेल्या इसमाला मस्जिद बंदर येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने ही कारवाई करत तब्बल २ कोटी ४० लाख रुपये किमतीचे ८ किलोंचे चरस त्याच्याकडून जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे इसम अवघा दहावी पासून काही दिवसांपूर्वीपर्यंत तो वाईन शॉपमध्ये सेल्समनची नोकरी करायचा. काही दिवसांपूर्वीच त्याने ती नोकरी सोडली आणि तो ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.
एएनसीचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव, वरळी कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल कदम व पथकाने ही कारवाई केली. हा संशयित इसम युसूफ मेहर अली रोड, मस्जिद बंदर येथे संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडे ८ किलो चरस सापडलं. त्याच्याकडील सर्व माल जप्त करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
काही दिवसांपूर्वीच ५ तस्करानांही अटक
अवघ्या काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी सेल गुन्हेगारी शाखा, मुंबई पोलिसांनी 355 ग्रॅम एमडीसह अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ जणांना अटक केली होती. तेव्हा जोगेश्वरी, सांताक्रूझ आणि धारावी परिसरातून 355 ग्रॅम एमडी (एमफेडिओन) जप्त करण्यात आले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून 16 लाखांची रोख रक्कमही ताब्यात घेण्यात आली होती. तसेच एक नोट मोजण्याचे मशीनसह, विद्युत वजनाचे यंत्र आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली. आझाद मैदान व वांद्रे युनिट च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती.